अनेक तासांचे प्रयत्न ठरले निष्फळ
बाण लागलेले जखमी वानर
विजय पाटील / सरवडे
राधानगरी येथे अज्ञात व्यक्तीने बाण मारल्यांने एक वानर जखमी झाले. अंगात आरपार शिरलेला बाण घेवून ते वानर कळा असह्य होत असल्याने उड्या मारत फिरत होते. जखमी वानराची अवस्था पाहून ग्रामस्थ व वन्यजीव विभागाने त्याला अनेक तासांच्या प्रयत्नानंतर पकडून उपचाराचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या शरिरात आरपार शिरलेल्या जाड बाणामुळे खोल जखम झाल्याने वानराचा मृत्यू झाला. राधानगरीकर व वन्यजीव विभागाने वानराला वाचविण्यासाठी अनेक तास शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
काल सायंकाळी राधानगरी बाजारपेठेत बाण लागलेल्या अवस्थेत एक वानर फिरताना दिसून आले. काही नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू लोक जवळ जातील तसे ते दूर जात होते. त्यानंतर जखमी वानराची माहिती बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर व आदींनी स्थानिक वन्यजीव विभागाला दिली. वन्यजीव विभागाने वानराला उपचारासाठी पकडण्याचा त्यांनी अनेक तास प्रयत्न केले परंतु ते सापडेना. त्याच्या शरिरात घुसलेला आरपार बाण आणि जखमेने घायाळ झालेले ते वानर पाहून स्थानिक ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. रात्रीचे सात वाजले तरी वानर सापडत नसल्यामुळे कोल्हापूरवरून वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बोलावण्यात आले.
कोल्हापूरात वन्यजीव विभागाची रेस्क्यू टीम राधानगरीत तात्काळ दाखल झाली. रात्रीचा अंधार व भीतीपोटी पळून जाणारे वानर यामुळे बराच कालावधी झाला. अखेर रात्री सव्वा नऊच्या सुमारास ते वानर पकडण्यात यश आले. जखमी अवस्थेतील वानराला राधानगरी वन्यजीव कार्यालयात नेवून उपचार सुरू केले. परंतु मोठा बाण आरपार घुसल्याने खोलवर जखम झाली होती. उपचाराला वानर साथ देत नसल्याने पुढील उपचारासाठी त्याला कोल्हापूरला नेत असताना वानराने प्राण सोडला. राधानगरी ग्रामस्थ व वन्यजीव विभाग यांनी अनेक तास प्रयत्न करून वानराला वाचवण्याचा सर्वोतरी प्रयत्न केला परंतु यश आले नाही. त्यांनी एका वानराचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड कौतुकास्पद आहे.









