प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात मंगळवारी शाहूवाडी तालुक्यातील दोघांचे, पन्हाळा तालुक्यातील एकाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या तीन रूग्णांमुळे जिल्हय़ातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे. यातील दोघांनी मुंबईतून आणि एकाने तमिळनाडूतून प्रवास केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी आली.
सीपीआर हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 141 जणांची तपासणी केली. सध्या आंतरररूग्ण विभागामध्ये 268 संशयित उपचार घेत आहेत. आजपर्यत 359 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी 354 जणांचे रिपोर्ट मंगळवारी निगेटिव्ह आले. अद्यापी 259 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. अद्यापी 59 नमुने अप्रमाणित आहेत. सध्या सीपीआरमध्ये 7 पॉझिटिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सांयकाळी शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून काही स्वॅब रिपोर्ट आले. त्यात तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील केर्ले (आंबा, विशाळगड) येथील तरूण (वय 23) याचा समावेश आहे. तो तमीळनाडूत चार महिन्यांपासून काम करत होता. रविवारी, 10 मे रोजी तो गावात आला. त्याला तपासणी करून इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन केले होते. त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शाहूवाडी तालुक्यातील माणगाव येथील तरूण (वय 20) मुंबईला गेला होता. त्याने विक्रोळी ते मुंबई असा प्रवास केला आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून स्वॅब घेतला होता. तो इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन आहे. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याला उपचारार्थ सीपीआरच्या कोरोना वॉर्डमध्ये दाखल केले आहे. त्यामुळे सीपीआरमधील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील तरूण (वय 30) हा मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहे. तो शनिवारी, 9 रोजी सीपीआर हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आला होता. त्याचाही स्वॅब घेतला होता. त्यानंतर त्याला इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन केले होते. त्याचा स्वॅब रिपोर्ट सायंकाळी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे.








