डब्ल्यूएचओ प्रमुखांचा इशारा
वृत्तसंस्था / जीनिव्हा
कोरोना महामारीदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी जीवघेण्या विषाणूबद्दल गंभीर इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या सर्व 194 देशांच्या आरोग्य मंत्र्यांच्या वार्षिक बैठकीत टेड्रोस यांनी हा इशारा दिला आहे. जग अद्याप अत्यंत धोकादायक स्थितीत कायम राहणार आहे. कोरोना विषाणू लसीकरणानंनतरही धोका संपणार नसल्याचा इशारा टेड्रोस यांनी अमेरिकेसारख्या देशांना दिला आहे.
कोरोना विषाणू आणि त्याचे व्हेरियंट फैलावत असेपर्यंत बेसावध होऊ नये. महामारीला सामोरे जाण्याची ही जगाची अखेरची वेळ नाही. भविष्यात कोरोनाच्या तुलनेत अधिक संक्रमक आणि घातक विषाणू उद्भवण्याची शक्यता आहे असे उद्गार डब्ल्यूएचओ महासंचालकांनी काढले आहेत.
लसीची साठेबाजी करणाऱया देशांनाही टेड्रोस यांनी सुनावले आहे. कोरोना लसीच्या वितरणावरून जगात ‘अपमानास्पद असमानता’ निर्माण झाली आहे. जगातील एकूण 75 टक्के लसी केवळ 10 देशांमध्येच देण्यात आल्या आहेत. गरीब देशांमध्ये लोकांचा जीव वाचविण्यासाठी नवे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. लसीची साठेबाजी करणाऱया देशांनी गरीब देशांना लस उपलब्ध करावी असे आवाहन टेड्रोस यांनी केले आहे.









