जेव्हा जेव्हा समाजाला ग्लानी येते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेण्याचे कबूल केले होते. या कलियुगात परमेश्वराचा अवतार अशक्मयप्राय वाटायला लागला आहे. हल्ली संकटांमुळे समाजाला ग्लानी आली की टीव्हीवरचे उपटसुंभ अवतरतात. ते मदत करायला नसून टीआरपी वेचायला आलेले असतात. नंतर टीव्हीच्या पडद्यावर चर्चासत्रे अवतरतात. या सत्रात अँकर (हा फक्त विरोधी पक्षातल्या नेत्यांवर किंचाळत असतो), दोन तीन राजकीय प्रवक्ते, एखादा निवृत्त पत्रकार आणि क्वचित एखादा संबंधित विषयातला तज्ञ असतो. चर्चेतून निष्पन्न काहीच होत नाही. रोगाची साथ आली की रामबाण औषध सांगणारे विद्वान सोशल मीडियावर अवतार घेतात. ‘बहात्तर रोगांवर एकच औषध’ च्या चालीवर सर्व रोगांवर लिंबाच्या सालींचा कीस आणि तुळस, कडुनिंब वगैरे वनस्पती, क्वचित निलगिरी तेल आणि एखाद्या महाराजांची विभूती सुचवतात. डॉक्टर नसलेले काही विद्वान होमिओपॅथीतली औषधे (त्यांच्या मनाने) सुचवतात.
कोरोनामुळे आम्ही भयभीत झालो होतो आणि रेड झोनात निवास असल्याने अनेक दिवस घरात लपून होतो. जातीच्या सुंदरी घराबाहेर पडताना ओठांवर लिपस्टिक फिरवून निघतात. तसे आम्ही अंगणात जाताना ओठांवर मुखपट्टी बांधून जात होतो, जातो. स्वभावात नसली तरी रक्तात शर्करा असल्याने तिच्या निर्मूलनार्थ घरातल्या घरातच व्यायाम करण्याचा प्रयत्न करीत होतो. परवा कोणीतरी एक बाटली फुकट आणून दिली आणि तिच्यातल्या गोळय़ा तीन दिवस घेतल्यास कोरोना नष्ट होतो असे सांगितले. ओठांवरचा मास्क न काढता त्या व्यक्तीचे आभार मानले. बाटलीला वंदन करून देवघरात ठेवली.
काल सकाळी उठून आंघोळ, देवपूजा केल्यावर बाटली काढून उघडली, आणि हर, हर. चुकून सगळय़ा गोळय़ा सांडल्या की. लक्षावधी सूक्ष्म गोळय़ा! हे झाले तेव्हा कुटुंब आतल्या खोलीत होते हे नशीब. आम्ही खाली वाकलो आणि एकेक गोळी उचलून बाटलीत भरली. सगळय़ा गोळय़ा भरून झाल्या तेव्हा अंग घामाने थबथबले होते. एक प्रकारचा व्यायामच की! मनात आले, आता मधुमेहासाठी वेगळा व्यायाम करायची गरज नाही.
आज आम्ही आंघोळीपूर्वीच बाटली उघडली आणि उपडी केली. पुन्हा गोळय़ा उचलून भरल्या. मग स्वेदभरल्या देहाने स्नानाला गेलो. घरातल्या घरात मधुमेहावर मात करण्याचा जालीम उपाय सापडला. आता रोज हेच करायचे. कोरोनाचे काय म्हणता? आधी लग्न मधुमेहाचे.








