प्रतिनिधी/ नागठाणे
महाराष्ट्रासह सातारा जिह्यात कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र सर्वसामान्य नागरिक अजूनही बेफिकरीने वागत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. त्यामुळे आता नागठाणे (ता.सातारा) येथील सैन्यदलातून निवृत्त झालेले फौजी पुढे सरसावले असून कोरोनाशी लढण्यासाठी व सामान्य जनतेत सोशल डिस्टन्सिंगचे महत्व सांगण्यासाठी नागठाणे ग्रामपंचायतीच्या मदतीला येत पुन्हा आपली वर्दी अंगावर चढवली आहे.
दिवसेंदिवस सातारा जिह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. जिह्यातील मोठय़ा शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात सापडू लागले आहेत. आशियाई महामार्गावरील नागठाणे हे बाजारपेठेचे मुख्य गाव असून या गावाशी पंचक्रोशीतील अनेक गावांचा सतत संपर्क आहे. नुकतेच राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने येथे गावाबरोबरच इतर गावातील नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. नागठाणे परिसरातील अनेक गावातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अद्यापतरी नागठाणे व त्याच्या लगतची गावे ‘सेफ झोन’ मध्ये असली तरी मुंबई-पुण्याहून आलेली व होम क्कॉरंटाईन केलेली अनेकजण बाहेर फिरत असल्याने येथील नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोरगाव पोलिसांकडून या भागात बंदोबस्त नेमला आहे. मात्र तो पुरेशा नसल्याने होणाऱया गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे नागठाणे ग्रामपंचायतीने गावातील सेवानिवृत्त सेना जवानांना मदतीला येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सैन्य दलातून निवृत्त झालेल्या येथील फौजींनी गावाच्या रक्षणासाठी पुन्हा आपली वर्दी अंगावर चढवली आहे. मंगळवारी या जवानांनी गावातील मुख्य रस्त्यावरून फिरून कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या काळजीची माहिती दिली. तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱया नागरिकांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्याचा इशाराही दिला









