क्रिकेट, नेमबाजीपासून बॅडमिंटनपर्यंत, हॉकी-फुटबॉलपासून कुस्तीपर्यंत विविध खेळाडू, फेडरेशन्स, संघटनांचा मदतीसाठी पुढाकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अवघा भारत कोव्हिड-19 च्या महासंकटाविरुद्ध जोमाने लढा देत असताना या ऐतिहासिक लढय़ात भारतीय क्रीडा विश्वाने देखील आवर्जून पुढाकार घेतला आहे. क्रिकेटपासून बॅडमिंटनपर्यंत आणि हॉकीपासून कुस्तीपर्यंत विविध स्तरावरुन खेळाडू, फेडरेशन्स व अनेक संघटनांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. क्रिकेटपटू, नेमबाज, बॅडमिंटनपटू या सर्वांसह स्थानिक, राज्य संघटनांचा यातील वाटा निश्चितच लक्षवेधी ठरला आहे.
हॉकी इंडिया व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांनी प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत केली असून जागतिक स्तरावर देखील विविध खेळाडू व संघटनांनी सढळ हस्ते सहकार्य केले. इंग्लिश क्रिकेट व वेल्स मंडळाने 61 दशलक्ष पौंड रकमेची मदत जाहीर केली तर इंग्लिश क्रिकेटपटू जोस बटलरने गतवर्षी संपन्न झालेल्या आयसीसी वर्ल्डकप फायनलमध्ये परिधान केलेल्या शर्टचा लिलाव करत त्यातून मिळालेला निधी कोव्हिड-19 विरुद्ध लढय़ासाठी सुपूर्द करत असल्याची घोषणा केली आहे.
भारताचा आघाडीचा विस्फोटक फलंदाज, सलामीवीर रोहित शर्माने मंगळवारीच या ऐतिहासिक लढय़ासाठी 80 लाख रुपये प्रदान केले असल्याचे जाहीर केले आहे.
हॉकी इंडियाचे 25 लाख

नवी दिल्ली : कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी हॉकी इंडियाही पुढे आली असून पंतप्रधान मदतनिधीसाठी 25 लाख रुपये देणार असल्याचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी सांगितले. कोरोना महामारीमुळे देश सध्या अडचणीत असून प्रत्येकाने सामाजिक भान जपत मदतीचा हात पुढे केला पाहिजे, असे मतही अहमद यांनी व्यक्त केले. देशाच्या कठीण काळात हॉकी इंडियाचा नेहमी पुढाकार राहिला असल्याचे हॉकी इंडियाचे महासचिव राजिंदर सिंग यांनी सांगितले.
भारतीय फुटबॉल महासंघाकडूनही 25 लाखांची मदत

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल महासंघाने कोरोविरुद्ध लढय़ासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी 25 लाख रुपये देणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. कोरोनाविरुद्ध लढा एकवटण्यासाठी अवघा देश एकवटला आहे. भारतीय फुटबॉल महासंघाकडूनही सर्वानुमते 25 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले. दरम्यान, एआयएफफने आपले दिल्लीतील कार्यालय बंद केले असून अनेक कर्मचाऱयांना घरातूनच काम करण्यास सांगितले असल्याचेही पटेल यांनी सांगितले.
गरजू व्यक्तांसाठी गांगुलीने दिले दोन हजार किलो तांदुळ

कोलकाता : कोरोनाविरुद्ध लढय़ात बीसीसीआय अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुलीचा पुढाकार राहिला असून बुधवारी त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे करताना कोलकातामधील बेलुर मठात वास्तव्यास असलेल्या गरजू व्यक्तीसाठी तब्बल दोन हजार किलो तांदळाचे वाटप केले आहे. गांगुलीने या मदतकार्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
दरम्यान, मागील आठवडय़ात गांगुलीने 50 लाख रुपयांचे तांदूळ गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी राज्य सरकारला दिले होते. कोलकात्यामधील बेलुर मठात बंगालमधील अनेक गरजू लोक वास्तव्यास असल्याचे समजल्यानंतर त्याने दोन हजार किलो तांदुळ याठिकाणी दान केले आहेत. या कठीण परिस्थितीत कोणत्याही मदतीची अपेक्षा असेल तर सरकराने आम्हाला सांगावे, या खडतर काळात सरकारसोबत असल्याचेही त्याने सांगितले. याशिवाय, क्वारंटाईनसाठी ईडन गार्डन्स मैदानाची आवश्यकता असेल तर मैदानही उपलब्धही करुन देऊ, असेही त्याने यावेळी सांगितले आहे.
अनिल कुंबळेचाही पुढाकार

बेंगळूर : देशभरात धुमाकुळ घालणाऱया कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे येत आहेत. क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरपासून विराट कोहली, रोहित शर्मा यांनी पंतप्रधान सहायता निधीला आर्थिक मदत पुरवली आहे. मंगळवारी टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनीही कोरोनाविरूद्ध लढय़ात पंतप्रधान मदत निधी आणि कर्नाटक राज्य मदत निधीला देणगी दिल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे कुंबळे यांनी कर्णधार विराटचा मार्ग अवलंबत गुप्त दान केले आहे. या महान क्रिकेटपटूने ट्विटरद्वारे याबद्दल माहिती दिली, मात्र इतर क्रिकेटपटूप्रमाणे त्यांनी रक्कम जाहीर केली नाही.
‘कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी आम्हाला ही लढाई एकत्र लढण्याची गरज आहे. मी पीएम केअर फंड आणि सीएम रिलीफ फंडामध्ये काही योगदान दिले आहे. कृपया घरी रहा आणि सुरक्षित रहा’, असे ट्विट कुंबळे यांनी केली आहे. दरम्यान, विराटने किती रक्कम दान केली यावर अद्याप कोणतीही स्पष्टता मिळाली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी 3 कोटीची मदत सरकारला दिली असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, कुंबळेपूर्वी सचिनने 50 लाख, सुरेश रैना 52 लाख तर रोहितने 80 लाखांची देणगी दिली आहे. बीसीसीआयनेही 50 कोटींची देणगी दिली आहे. केवळ क्रिकेटपटूच नाही तर अन्य खेळाडू देखील या कठीण परिस्थितीत एकत्र येत मदत करत आहे.









