राज्य सरकारचा पुढाकार : तात्काळ बाधितांचा शोध घेण्यासाठी व्यवस्था
प्रतिनिधी / बेंगळूर
राजधानी बेंगळुरातील कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई पॅटर्न राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे घाबरलेल्या मुंबईत तेथील महानगरपालिकेने कोविड नियंत्रणासाठी प्रत्येक वॉर्डात समितीची स्थापना केली होती. त्यानुसार तेथे नवीन बाधितांवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. त्याच धर्तीवर बेंगळुरातही वॉर्डनिहाय समितीची स्थापना करण्याचे निर्देश सरकारने बेंगळूर महानगरपालिकेला दिले आहेत. तसेच याबाबत आदेशही काढला असून तात्काळ वॉर्डनिहाय समितीची स्थापना करण्याची सूचना केली आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची ऑक्सिजन, बेडची कमतरता दूर करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर तात्काळ कोविड रुग्णांचा शोध घेण्याची व्यवस्था जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार घरोघरी सर्वेक्षण करण्याचीही तयारी सुरू केली आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह असणाऱयांचा शोध घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब होत आहे. असमर्पक कामकाजामुळे बाधितांचा शोध घेण्यास विलंब होत असल्याने आता असणारी व्यवस्था बदलण्यात येणार आहे.
शहरातील सर्व 198 वॉर्डात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आपत्कालीन समिती स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या समित्या कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार करण्यासह आवश्यक असणाऱयांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत होणार आहे. सदर समिती रंगांच्या कोडद्वारे बाधितांची ओळख निर्माण करून देईल. लाल रंगाचे कोड असणाऱया बाधितांना रुग्णालयात, पिवळय़ा रंगाचे कोड असणाऱयांना घरातच आयसोलेट करून उपचार केले जाणार आहेत. सदर समिती बाधितांवर बारकाईने लक्ष ठेवणार असून वॉर्डनिहाय ऑक्सिजनची आवश्यक असणाऱयांना 2 तासात ऑक्सिजन पुरविणार आहे. गरज असणाऱयांनाच बेड पुरविण्याचे कार्य समितीद्वारे केले जाणार आहे. प्रत्येक वॉर्डात मध्यम संसर्ग असणाऱयांना 5 ते 7 दिवसांपूर्वी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे. त्याचबरोबर तीव्र संसर्ग असणाऱयांवर उपचार करून 10 दिवसात रुग्णालयातून डिस्चार्ज द्यावेत. एखाद्यावेळेस हे शक्य न झाल्यास याबाबत संबंधित अधिकाऱयांनी समितीला अहवाल द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.









