आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे निवेदन
प्रतिनिधी / पणजी
कोविड-19 ला टक्कर देण्यासाठी सरकार आणि आरोग्य खाते सक्षम व समर्थ असून जनतेच्या हितासाठी काम करीत असल्याचे निवेदन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सोमवारी विधानसभेत केले.
ते म्हणाले की, हे सरकार संवेदनशील असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करीत आहे. सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, नर्स तसेच इतर आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्वजण कोरोना महामारीच्या विरोधात लढत आहेत. कोरोनासंदर्भातील कोणतीच माहिती लपवली जात नाही आणि ती जनतेसाठी उघड केली जाते, असेही राणे यांनी सांगितले.
सोशल मीडियावरून खोटय़ा बातम्या
मुख्यमंत्री व आपण एकमेकांना चांगले सहकार्य करीत असून उगाच विनाकारण अफवा किंवा खोटय़ा बातम्या सोशल मीडियावरून प्रसारित केल्या जातात. आरोग्य खात्याला मुख्यमंत्र्यांची मोलाची साथ लाभत असून कोरोना तपासणी आणि अहवाल वेगाने व्हावेत तसेच निकाल लवकर मिळावेत म्हणून प्रयत्न चालू आहेत. गोवा राज्य विविध अत्यावश्यक वस्तूंसाठी इतर राज्यांवर अवलंबून असल्याने काही प्रमाणात आंतरराज्य वाहतूक चालू ठेवावी लागते, असेही राणे यांनी नमूद केले.
सरकार आपले काम थांबवू शकत नाही काहीजण विनाकारण गरज नसताना कोणत्याही विषयावर कोर्टात किंवा लोकायुक्तांकडे जातात म्हणून सरकार किंवा आरोग्य खाते आपापले काम थांबवू शकत नाही. ते चालूच ठेवावे लागते. कोणाला जायचे तेथे जाऊ दे. जनतेसाठी काम करावेच लागते आणि ते सरकार करीत रहाणार आहे. अनेकांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून तो सोडण्यासाठी देखील सरकारला पुढाकार घ्यावा लागणार असल्याचे राणे म्हणाले.









