प्रतिनिधी / पन्हाळा
स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे प्रतिशिवाजी नरवीर शिवाकाशीद यांची पुण्यतिथी कोरोनासंकटामुळे अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. प्रतिवर्षी शिवाकाशीद यांचा इतिहास धगधगत ठेवण्यासाठी विविध कार्यक्रमांनी मोठ्या प्रमाणात 13 जुलै रोजी शिवाकाशीद यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते.पण यावेळी कोरोना संसर्गामुळे या पंरपरेला फाटा देत पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापुर येथील शिवाकाशीद समाधीस्थळ येथे मोजक्याच लोकांच्या उपस्थित समाधीला पुष्पहार अर्पण करुन शिवाकाशीद यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी सोशल डिस्टन्स,मास्क वापरण्याची विशेष काळजी घेण्यात आली होती.त्यानंतर पन्हाळ्यातील जकात नाका येथील वीर शिवाकाशीद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार चढवुन अभिवादन करण्यात आले.यावेळी इतिहास अभ्यासक डाँ.अमर आडके यांनी इतिहासाला उजाळा देत वीर शिवा काशीद व बाजीप्रभु देशपांडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी तहसिलदार रमेश शेंडगे,पन्हाळ्याच्या नगराध्यक्षा रुपाली थडेल,कोल्हापुर नाभिक समाजाचे अध्यक्ष सयाजी झुंझार,उपनगराध्यक्ष चैतन्य भोसले,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल,माजी पोलिस पाटील भिमराव काशीद,वीरशिवा काशीद यांचे थेट वंशज प्रविण काशीद,सखाराम काशीद,राजु काशीद,बाळु काशीद,स्वप्नली काशीद,आनंदा काशीद आदी उपस्थित होते.








