वृत्त संस्था/ डब्लीन
संपूर्ण जगामध्ये निर्माण झालेल्या कोरोना महामारी संकटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व क्रीडास्पर्धा लांबणीवर किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे येत्या ऑक्टोबरमध्ये येथे होणारी डब्लीन मॅरेथॉन रद्द केल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे.
कोव्हिड-19ची परिस्थिती लवकर आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नाहीत पण आयर्लंडने सोमवारपासून देशात घालण्यात आलेले सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. डब्लीन मॅरेथॉन 25 ऑक्टोबर रोजी आयोजित केली होती पण ती आता रद्द केल्याचे आयोजकांनी सांगितले. गेल्यावर्षै डब्लीन मॅरेथॉनमध्ये सुमारे 22500 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता. ऑगस्ट महिन्यानंतर आयर्लंडमध्ये लॉकडाऊन संपूर्णपणे उठविला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लंडन मॅरेथॉन कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली असून ही मॅरेंथॉन आता 4 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. लंडन मॅरेथॉनमध्ये गेल्यावर्षी 43000 धावपटूंनी सहभाग दर्शविला होता. कोरोना महामारीत आयर्लंडमध्ये आतापर्यंत 1547 जणांचा मृत्यू झाला आहे.









