भक्तांकडून बाप्पांकडे एकच मागणी : ‘ संकट दूर कर विघ्नेश्वरा’ हेच साकडे : ग्रामीण भागातही गणरायांच्या आगमनाची चाहूल
प्रतिनिधी / बेळगाव
गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषात आणि गणेशाच्या आगमनासाठी आपण कोणकोणती तयारी केली पाहिजे या विचारात आता शहरवासियांना वेध लागले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाचे… पण या आगमनाबरोबरच कोरोनालाही हद्दपार कर आणि आपल्या देशावर आलेले संकट दूर कर विघ्नेश्वरा असे साकडेवजा मागणीही गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाकडे व्यक्त करत आहेत. मोठा गाजावाजा करून आगमनाची तयारी करण्यासाठी चार-पाच महिन्यांपूर्वीपासूनच भक्तगण तयार असतात. मात्र, कोरोनामुळे सर्वच भाविकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांवर गणेशचतुर्थी येऊन ठेपली आहे. त्यामुळे काही भक्तगण आतापासून कामाला लागले असले तरी कोरोनाचे संकट दूर करूनच बाप्पाच्या आगमनाची तयारी करू, असेही ठरविले जात आहे.
आतापासूनच सोशल मीडियावर गणेशाच्या आतुरतेचे मेसेज टाकण्यास सुरुवात झाली असली तरी पूर्वीप्रमाणे फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर गणेशाच्या आगमनाबद्दलचे नानाविध मेजेस पडत नाहीत. कारण कोरोनाचा राक्षस समोर असून त्याला बाप्पाने हद्दपार करावे, आणि मगच भक्तांकडे वास्तव्यास यावे, एवढी मागणी मंजूर करा गणराया, असे साकडे बाप्पाकडे आवर्जुन घालण्यात येत आहे. श्रीमूर्ती मातीचीच असावी, असा प्रशासनाचा दंडक आणि यामुळेच यंदा लांबलेले गणपतीबाप्पा साकारण्याचे चित्र सध्या सर्वत्रच पाहायला मिळत आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या अटींमुळे गणेशमूर्ती बनविणाऱया अनेक कलाकारांवर संकट कोसळले होते. ते संकट कायम राहणार की काय अशी भीती असतानाच कोरोनाचा राक्षस उभा ठाकला आहे. गतवषीही अत्यंत साधेपणाने गणेशबाप्पांचे आगमन झाले होते. त्यावेळी कोरोनाचा समूळ नाश होऊन बाप्पाचे आगमन मोठय़ा आनंदात करू, अशी आशा भक्तांना होती. मात्र, हा राक्षस आ-वासून उभा असून आता बाप्पाने त्याचा नायनाट करावा, अशी मागणी बाप्पाकडे करण्यात येत आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते, हा मुद्दा पुढे करून प्रशासनाने अशा मूर्तींवर टाच आणली आहे. यामुळे मूर्तिकारांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. सध्या शहरात मातीच्या गणपती मूर्तींचे आगमन होऊ लागले असून त्यावर मूर्तिकारांनी हात फिरविण्यास सुरुवात केली असली तरी पूर्वीइतका उत्साह दिसत नाही. गणेशचतुर्थीच्या आगमनासाठी प्रत्येक जण उत्साहाने आणि चैतन्यमय असायचा. प्रशासनाच्या नियमांचे पालन करून अनेक गणेश मूर्तिकार मूर्ती बनवत असले तरी प्रशासनातील अधिकाऱयांनाच कोरोनाच्या महाभयंकर विषाणूने पुरते हैराण करून सोडले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकारीही बाप्पाकडे हे विघ्न दूर करण्याची मागणी करताना दिसत आहेत. तीन महिन्यांवर गणेशचतुर्थी येऊन ठेपली आहे. मात्र, उत्साहाला निर्बंध आले आहेत. त्यामुळे मागील वेळीप्रमाणेच यावषीचा गणेशोत्सव साधेपणाने करावा की बाप्पा आपल्या देशावर आलेले संकट दूर करणार? हे येता काळच ठरविणार आहे. सध्या मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या लगबगीत असल्याचे चित्र सध्या शहर परिसरात पाहावयास मिळत आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही मूर्तिकार विविध स्वरुपातील मूर्ती साकारण्यात गुंतले असून सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती करण्यास प्रारंभ करण्यात आला नाही. मात्र, घरगुती गणपती बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. विशेषतः मातीच्या मूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांचा अधिक कल आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही आतापासूनच गणरायांच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागून राहिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यावषी आपण गणपती मोठय़ा आनंदात आणि उत्साहात आणणार, तर काही जण आपण पारंपरिक गणेशाच्या आगमनाची तयारी करत असल्याचे मेसेज मागील वषीपासून कमी झाले आहेत. कोरोनामुळे केलेले नियोजन रद्द करून अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यावषीच्या गणेशोत्सवावरही निर्बंध घालणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र भक्तांनी आपल्या बाप्पाकडे कोरोनाचा राक्षस दूर करा बाप्पा, असे साकडे घातले आहे.









