जॉन्सन अद्याप आयसीयूत

ब्रिटनमध्ये 24 तासांमध्ये 938 जणांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर देशातील बळींचा आकडा 7097 झाला आहे. कोरोनाबाधित ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अद्याप आयसीयूत आहेत. पंतप्रधानांचे मनोबल दृढ असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे 10 डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
इटलीत रुग्ण वाढतेच

इटलीत बुधवारी 542 जणांना जीव गमवावा लागला असून 3836 नवे रुग्ण आढळले आहेत. तर देशभरात आतापर्यंत 17669 जणांचा बळी गेला आहे. एकूण रुग्णांची संख्या 139422 वर पोहोचली आहे. देशात सोमवारपासून मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत मात्र घट झाली आहे. मंगळवारी 604 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता कायम आहे.
स्पेनमध्ये टाळेबंदी शिथिल

स्पेनमध्ये दिवसभरात 747 जणांचा मृत्यू झाला असून 6278 रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 14 हजार 792 जणांचा बळी गेला आहे. टाळेबंदीत किंचित सूट देण्यात येणार आहे. देशात कठोर टाळेबंदी लागू केली असून ती काही प्रमाणात शिथिल करण्याची वेळ आल्याचे उद्गार पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी काढले आहेत.
ऑस्ट्रेलिया : क्रूजचा ब्लॅक बॉक्स जप्त

ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी रुबी प्रिन्सेस क्रूजवर कारवाई केली आहे. क्रूजवरील हजारो लोकांना सिडनीत उतरण्याची अनुमती देण्यात आली होती. परंतु त्यानंतर 15 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी प्रोटेक्टिव्ह गियर्स आणि मास्क परिधान करून क्रूजमध्ये शिरून ब्लॅक बॉक्स जप्त केला आहे.
न्यूझीलंडमध्ये प्रवाशांचे विलगीकरण

विदेशातून न्यूझीलंडमध्ये येणाऱया सर्व प्रवाशांना शुक्रवारपासून किमान 2 आठवडय़ांसाठी विलग केले जाणार आहे. आता कुठलाच नागरिक स्वतःच्या घरात आयसोलेट होऊ शकणार नाही. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सलग चौथ्या दिवशी घट झाली आहे. न्यूझीलंडच्य
चीनमध्ये 63 नवे रुग्ण

चीनमध्ये बुधवारी 63 नवे रुग्ण सापडले आहेत. यातील 61 रुग्ण देशाबाहेरून आलेले आहेत. हुबेई प्रांतात बुधवारी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये एकूण 17 नवे संशयित सापडले आहेत. चीनच्या आरोग्य आयोगानुसार देशात आतापर्यंत 81 हजार 865 कोरोनाबाधित आढळले असून 3335 जणांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत मंत्री निलंबित
दक्षिण आफ्रिकेच्या दूरसंचार मंत्री स्टेला अंदाबेन यांना टाळेबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. काही लोकांसह लंचवर गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकाराची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. देशात 21 दिवसांची टाळेबंदी लागू असून 1749 रुग्ण सापडले आहेत. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
पेरूमध्ये 26 एप्रिलपर्यंत आणीबाणी

पेरू प्रशासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 26 एप्रिलपर्यंत आणीबाणी वाढविली आहे. कोरोनाच्या विरोधात सर्वात कठिण काळ समोर येत असल्याने त्याच्या विरोधात लढण्याचे प्रयत्न कमी करू शकत नसल्याचे उद्गार राष्ट्रपती मार्टिन विजकारा यांनी काढले आहेत. पेरूमध्ये रुग्णांची संख्या 4342 झाली आहे.
सर्बियात अध्यक्षांच्या पुत्राला लागण
सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी स्वतःचा पुत्र डेनिलो याला कोरोनाची लागण झाल्याची घोषणा बुधवारी केली आहे. डेनिलोला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्बियात आतापर्यंत 2666 रुग्ण आढळून आले असून 65 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्बियात कोरोना संकटामुळे सैन्याला पाचारण करण्यात आले
दक्षिण कोरियातही नवे रुग्ण

दक्षिण कोरियत बुधवारी कोरोनाचे 39 नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 10423 झाली आहे. तर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 204 झाली आहे. महामारीतून आतापर्यंत 6973 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 लाख 68 हजारांपेक्षा अधिक जणांची चाचणी करण्यात आली आहे. प्रशासनाने चाचणीवर भर दिल्याने संकटावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे.









