128 जणांना बाधा, आठवडाभरात मृत्यूदरात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत गेल्या एक-दीड महिन्यांपासून घट होत चालली आहे. प्रशासनाने लसीकरणाचा वेग वाढविला आहे. मात्र, गेल्या आठ दिवसात अचानक मृत्यूदर वाढला आहे. आठवडाभरात कोरोनाने जिल्हय़ातील 20 जण दगावले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वृद्धांची संख्या जास्त आहे.
आठवडाभरात तीन दिवस चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या रविवारी दि. 19 सप्टेंबर रोजी चौघा जणांचा तर सोमवार दि. 20 रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाला. मंगळवार दि. 21 सप्टेंबर रोजी तिघे दगावले असून बुधवारी 22 रोजी एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार दि. 24 सप्टेंबर रोजी 5, शनिवारी 2, रविवार 26 रोजी 1 अशा एकूण 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
गेला आठवडाभरात 128 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागत होते. सध्या लक्षणे नसणाऱयांचीच संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. गेल्या रविवारी 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर रविवार दि. 26 रोजी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
रविवारी बैलहोंगल, गोकाक, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. अथणी तालुक्मयात 2, बेळगाव तालुक्मयात 3, चिकोडी व हुक्केरी तालुक्मयात प्रत्येकी 1 असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. अद्याप 3 हजार 029 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ 200 सक्रिय रुग्ण आहेत.









