बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनाच्या संशयित रुग्णांवर देखरेख करण्यासाठी तसेच आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील चार खासगी हॉटेल्स आरक्षित करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाने संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन म्हणून अलिप्त ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्या बेळगाव जिल्हय़ात कोरोनाच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप एकही रुग्ण पॉझिटीव्ह आढळलेला नाही. मात्र नव्याने उघडकीस आलेल्या घडामोडांमध्ये नवी दिल्ली येथे मरकज कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या काही मंडळींच्या वैद्यकीय तपासणी सत्राला सुरूवात झाली आहे. त्यांच्यावर विशेष नजर ठेवून देखभाल तसेच औषधोपचार करण्याचे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. यासाठी हॉस्पिटलऐवजी हॉटेलचा पर्याय निवडण्याची वेळ आली आहे. चार हॉटेल्सची नावे निश्चित करण्यात आली असून त्यांना यासंदर्भात सूचना देऊन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य खात्याला सूचित करण्यात आले आहे.
सुवर्ण विधानसौधाच्या कक्षामध्ये व्यवस्थापन व्हावे
याबाबत काही संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉटेल्सच्याऐवजी सुवर्ण विधानसौधच्या इमारतीमध्ये या संशयितांची व्यवस्था करावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. त्यामुळे प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेणार याविषयी चर्चेचा उहापोह सुरू झाला आहे.









