गोमॅकोचे डीन शिवानंद बांदेकर यांच्याकडून उच्च न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर : वॉर्ड क्र. 102 राखीव
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाची तिसरी लाट आणि म्युकोरमायकोसीसच्या आजाराचा सामना करण्यास गोवा वैद्यकीय महाविद्यालय सज्ज असल्याचे प्रतिज्ञापत्र गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी गोव्यातील उच्च न्यायालयाला सादर केले आहे.
गोमेकॉचा प्रभाग क्र. 102 हा म्युकोरमायकोसीससाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये 30 खाटा आहेत व 7 रुग्ण भरती असल्याची माहिती उघड करण्यात आली आहे. एकूण 11 रुग्णांवर उपचार सुरू होते. पैकी चार जणांचे निधन झाले. या चौघा जणांना निमोनिया आणि ए.आर.डी.एस. अशी दुखणी होती, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
इंडियन ऍकॅडमी ऑफ ऑटोरिन्होलारिंगॉलॉजी या संस्थेने सदर आजारावर उपचार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. गोमेकॉतील ईएनटी विभागाचे डॉ. पूर्ण सज्ज असल्याचे म्हटले आहे. या आजारासाठी लागणारी औषध सामुग्री गोमेकॉकडे आहे.
भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ फर्मास्युटिकल्स या खात्याने गोव्यासाठी लिपेसोमोल एम्फोटेरीसीन बी या औषधाचे 300 युनिट मंजूर केले आहेत. त्यातील 250 युनिट पोहोचल्याची माहिती दिली आहे. उर्वरित 50 युनिट एका आठवडय़ाच्या आत मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तिसऱया लाटेसाठी सज्ज
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यास गोमेकॉ सज्ज आहे. या लाटेत मुलांना झळ पोहोचण्याची शक्यता असल्याने बालरोग तज्ञांचा समावेश असलेली 17 जणांची समिती स्थापून अहवाल मागितला आहे. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची संख्या कमी नाही. कुठल्याही क्षणी 290 डॉक्टर उपचारासाठी सज्ज असतात. त्यात 270 पोस्ट ग्रॅजुएट डॉक्टर, 134 एमबीबीएस पासआऊटना कोविड टास्क फोर्सच्या कामाला लावले आहे. या व्यतिरिक्त ईएसआयचे 18 डॉक्टर तर डेंटल महाविद्यालयाचे 43 डॉक्टर आणि 33 इनटर्न डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. विद्यमान परिचारिकांसोबत 400 नव्या भरती झालेल्या परिचारिका आहेत. बांबोळी येथील नर्सिंग इन्स्टिटय़ूटच्या 26 परिचारिका त्या व्यतिरिक्त शिक्षण पूर्ण केलेल्या 55 परिचारिका व शेवटच्या वर्षाला असलेल्या 92 परिचारिका विद्यार्थ्यांना कोरोना रुग्णांच्या सेवेला जुंपल्याचे उच्च न्यायालयाला कळविण्यात आले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 9 जून रोजी ठेवण्यात आली आहे.









