बेंगळूर/प्रतिनिधी
विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कोरोनाच्या दुसर्या लाटेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने तयारीसंदर्भात श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्यात सत्ताधारी भाजपचे मंत्री आणि आमदार स्वत: च्या सरकारने दिलेल्या नियमांचे उघडपणे उल्लंघन करीत आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पक्षातील मंत्री, आमदारांवर कोणतेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
कोरोनाची संख्या वाढत असताना राज्यभर संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार कोणती पावले उचलत आहे यावर श्वेतपत्रिका जरी केली पाहिजे, असे ते म्हणाले. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारचे नियम बनवले जात आहेत आणि कोणत्या प्रकारचे निर्बंध लादले जात आहेत. याविषयी सरकारने माहिती दिली पाहिजे. दरम्यान कोरोना साथीचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. सरकारने १२ महिन्यांत साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही तयारी केलेली नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.
कोविड -१९ रूग्णांना सरकारी रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालये परवडत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. रेमडेसिविर आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. दरम्यान गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक अचानक आणि पहिल्यांदा झाला होता. परंतु त्यानंतर, दुसरी लहर टाळण्यासाठी सरकारने तयारी करायला हवी होती. परंतु सरकारने दुर्लक्ष करत भ्रष्टाचारात व्यस्त असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.









