जगभर हाहाकार माजवणाऱया कोरोना विषाणूने महाराष्ट्रात पहिला बळी घेतल्याने देशातील बळींची संख्या तीनवर पोहोचली आहे. मात्र, या विषाणूचे स्तरनिहाय उपद्रवमूल्य पाहता येथून पुढचा टप्पा हा भारतासारख्या देशासाठी निश्चितच कसोटीचा असू शकतो. परदेशातील कोरोनाग्रस्तांकडून पर्यटक वा प्रवाशांना होणारी बाधा आणि संबंधितांपासून स्थानिकांना या आजाराची लागण होणे, असे कोरोनाचे प्रारंभीचे दोन टप्पे मानले जातात. सध्या देश याच अवस्थेतून जात आहे. मागच्या दोन आठवडय़ात राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 39 वर गेली असून, देशातील रुग्णसंख्येने सव्वाशेचा आकडा पार केला आहे. किंबहुना, तिसऱया व चौथ्या टप्प्यात हा व्हायरस अधिक उग्र रूप धारण करत असल्याचे दिसून येते. साथीचे स्वरूप प्राप्त होण्यासह त्याचा उद्रेक होणे म्हणजे काय, हे चीन, इटली, इराणसह अनेक देशांनी अनुभवले आहे. इटलीत 24 तासात 350, तर स्पेनमध्ये 100 जणांचा म्ा़=त्यू होणे, या घटना आजाराची दाहकताच दर्शवितात. जगभरात साडेसहा हजारांहून अधिक जणांचे प्राण घेणाऱया कोरोनाचा फैलाव असाच होत राहिला तर परिस्थिती अधिक भयावह होऊ शकते. त्यामुळे सर्व राष्ट्रांना हातात हात घालूनच या महासंकटाशी मुकाबला करावा लागेल. भारतात शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, मॉल बंद ठेवण्यापासून ते वर्क फ्रॉम होम, जमावबंदीपर्यंत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नवी मुंबई, औरंगाबादची महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्याचबरोबर 12 ग्राम पंचायतींच्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या आहेत. दुसऱया बाजूला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरासह तुळजापूर, आळंदी, देहू, कार्ला, सिद्धीविनायक, दगडूशेठ व अन्य मंदिरे तसेच प्रार्थनास्थळेही पुढील काही दिवस बंद राहतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस, रेल्वे, मेट्रोवरही निर्बंध आणण्याबाबत चाचपणी केली जात आहे. ही सगळी अभूतपूर्व कोंडी म्हणावी लागेल. स्वाईन फ्लूच्या साथीतही पुण्यासारख्या शहराला या चक्रातून जावे लागले होते. आताही पिंपरी-च्ंिाचवड या आजाराच्या केंद्रस्थानी पहायला मिळतात. किंबहुना, कोरोनाची व्याप्ती लक्षात घेऊन सर्वच राज्यांना, शहरांना नि खेडय़ांनाही काळजी घ्यावी लागेल. अशा विविध उपाययोजनांतून सगळय़ांचीच गैरसोय होणार असली, तरी अंतिमत: हे सर्वांच्या हिताकरिताच आहे, याची जाणीव ठेवून त्याबाबत सहकार्यशील दृष्टिकोन बाळगायला हवा. जागतिक मंदीच्या झळा आज सर्वच देशांना बसत आहेत. मंदीमुळे अर्थव्यवस्था कुंठितावस्थेत असताना कोरानामुळे ती अधिक खोलात जाण्याचा धोका संभवतो. युरोपीय संसदेच्या अहवालानुसार साथीच्या रोगांमुळे जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेला वार्षिक 500 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 36 लाख 97 हजार कोटी रु.च्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. संपूर्ण जगाच्या मिळकतीत हे प्रमाण 0.6 टक्के असून, साथीच्या आजारातील बळींची संख्या तब्बल 7 लाख 20 हजारपर्यंत असल्याचे आकडेवारी सांगते. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार साथीच्या रोगांमुळे वैश्विक जीडीपी दर 2.2 टक्क्यांपासून ते 4.8 टक्क्यांपर्यंत खालावतो. हे पाहता सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांना कोरोनाचा जबर फटका बसेल. शेअर बाजारावर दृष्टिक्षेप टाकला, तर मागच्या दोन ते चार दिवसांत बाजार सातत्याने कोसळलेला दिसतो. अनेक नामांकित कंपन्यांचे खालावलेले शेअर कोरोनाची दहशत दाखवून देतात. आजमितीला कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील व्यवहार वा उलाढाल ठप्प झाले आहेत. पर्यटन क्षेत्राला इतका मोठा फटका बसला आहे, की पुढचे आणखी काही महिने तरी पर्यटनाला चालना मिळण्याची सुतराम शक्यता नाही. क्रीडाक्षेत्रही या विषाणूच्या तडाख्यात सापडल्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची एकदिवसीय मालिका रद्द करण्याबरोबरच आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला घ्यावा लागला. विविध स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. याशिवाय आगामी टोकियो ऑलिंपिकवरही कोरोनाचे सावट दिसते. जपानच्या पंतप्रधानांनी ही स्पर्धा नियोजित वेळेत पार पाडण्याचा विश्वास व्यक्त केला असला, तरी अंतिम निर्णयाकरिता आणखी काही काळ वाट पहावी लागेल. अमेरिकेत कोरोनाच्या लसीची चाचणी सुरू झाली आहे. ती कितपत यशस्वी ठरते, हे लवकरच कळेल. कोरोनामुळे केवळ तीन ते चार टक्के लोकांनाच जीव गमवावा लागला असून, या आजारातून मुक्त होणाऱयांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे भय बाळगण्याचे कारण नाही. केवळ संसर्गाचा झपाटा बघता स्वच्छतेचा मंत्र जागवावा लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कशास काही नियम नुरला । कोणी रोगी कोठे थुंकला । कोठे जेवला, संसर्गी आला । गोंधळ झाला सर्वत्र ।। त्याने रोगप्रचार झाला । लागट रोग वाढतची गेला । बळी घेतले हजारो लोकाला । वाढोनी साथ । अशा शब्दात साथीच्या आजाराचे वर्णन केले आहे. बकाल शहरे, अस्वच्छता, चुकीची जीवनशैली, असकस आहार, निष्काळजीपणा व जागृतीचा अभाव अशा अनेकविध बाबी या आजारांसाठी पोषक ठरत आहेत. म्हणूनच उष्णतेचा तडाखा आल्यावर कोरोना आपोआप जाईल, या आशेवर विसंबून राहून चालणार नाही. तर जीवनशैली सुधारावी लागणार आहे. स्वच्छतेविणा जे भोजन । समजावे ते मलीनपण । अग्नी वाढाया हातपाय धुवोन । पुसोन भोजन करावे ।। असेही राष्ट्रसंत म्हणतात. संत गाडगेबांपासून सर्वच संतमहंतांनी स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीही स्वच्छतेचा पुरस्कार करते. म्हणूनच आपले शरीर, मन निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार, विहार व व्यायामाबरोबरच अशाच स्वच्छ जीवनशैलीचा अंगीकार करावा लागेल. त्यातूनच कोरोनाची ही कोंडी फुटू शकेल. आज सबंध जग वेगळय़ा वळणावर आहे. त्यातून सावरण्यासाठी सारे मिळून स्वच्छ जगासाठी कटिबद्ध होऊ या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








