मुरगूड / वार्ताहर
कोरोनाच्या संकटामुळे विकासकामामध्ये अनेक अडचणी आल्या आहेत. रोगाच्या दहशतीमुळे राज्यातील अनेक मल्टी स्पेशालिटी रुग्णालये बंद केली. पण या आणीबाणीच्या काळात राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कोरोनाला टक्कर दिली. ज्यावेळी कोरोना बरा होतो हे या खाजगी रुग्णालयाना समजले त्यावेळी लाखांची पॅकेज आली. ज्या ज्या रुग्णालयांनी कोरोनाचे बिल अवास्तव व अवाढव्य पध्दतीने आकारले अथवा भविष्यात आकारतील अशा रुग्णालयांचे ऑडीट करून ती कायमस्वरूपी सील करू असा इशारा आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला.
मुरगूड नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.
परिसरातील मध्यवर्ती आरोग्य केंद्र असणार मुरगुड ग्रामीण रुग्णालय 3O खाटांचे आहे. ते पन्नास खाटांचे करावे अशी नगराध्यक्ष जमादार यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ देत आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी ‘प्रस्ताव द्या: सहा महिन्यात प्रस्तावाला मान्यता देऊ ! ‘ असे आश्वासन दिले. सभेने टाळ्यांच्या कडकडाटात याचे कौतुक केले.
खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यपूर्व काळातील मुरगूड नगरपालिका व शहराचा लौकिक सांगितला. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी विचारांनी प्रेरित होऊन केलेल्या राजकीय मार्गक्रमणाचा प्रेरणादायी प्रवास मांडला. आपण संघर्षाऐवजी समन्वयाची भूमिका घेत एकसंघ चित्र ठेवण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व असून संकटाची मालिका असूनही विचलित न होता सामान्यांची काळजी घेणारा मुख्यमंत्री असे वर्णन करुन आरोग्य सक्षमीकरणाच्या प्रयत्नाचे कौतुक केले.
अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याचे शिवधनुष्य मंडलिक युवा प्रतिष्ठानने लोकवर्गणीच्या बळावर उचलले असून शहरवासियांनी भरघोस देणगी देण्याचे आवाहन केले. खाजगी रुग्णालयांनी कोरोणा महामारीच्या काळात रुग्णांची केलेली आर्थिक लूट अॅड. मंडलिक यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली
नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविकात मंडलिकांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्तेवर आलेल्या मुरगूड नगरपालिकेने गेल्या चार वर्षांमध्ये जाहीरनाम्यातील वचनपूर्ती केल्याचे सांगून बारा वर्षे रखडलेले अंबाबाई देवालयाचे कामही पूर्णत्वास जाणार असल्याचे व पाणी योजनेचे पाणीपुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असल्याचे सांगितले. स्वच्छता अभियानात देशात अव्वल स्थान पटकावून सहा महिन्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचेही सांगितले.
सुरेश कुराडे व विजय देखणे यांचीही भाषणे झाली.
…………………………………………………….
सतेज पाटील यांच्या गैरहजेरीबाबत मंडलिकांची खंत
……………………………………………………
‘आमचं ठरलंय ‘ च्या माध्यमातून आपली आणि सतेज पाटील यांची मैत्री निर्माण झाली.या प्रेमातून आम्ही या कार्यक्रमाचे दोनदा निमंत्रण दिले होते. पण काहीतरी कारण सांगून त्यांनी येणे टाळले. आता ते का आले नाहीत माहिती नाही. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी याचा शोध घ्यावा. असे सांगून आपल्या मनोगतात खासदार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील आले नसल्याबद्दलची भाषणात दोन वेळा खंत व्यक्त केली.
……………………………………………
कोरोणातील लूट आणि कारवाईचा इशारा
…………………………………………………….
खाजगी रुग्णालयांनी कोरोणा महामारीच्या काळात रुग्णांची केलेली आर्थिक लूट अॅड. विरेंद्र मंडलिक यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. जिल्हा शिवसेना प्रमुख विजय देवणे यांनी त्याला दुजोरा दिला. आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी याबाबत गंभीर नोंद घेऊन कारवाईचे आश्वासन देत दिलासा दिला.
Previous Articleदोघा अट्टल आंतरराज्य घरफोडय़ांना अटक
Next Article अगरबत्ती कारखान्याला आग









