वार्ताहर/ एकंबे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांना तिलांजली देत नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करणाऱयांवर प्रांताधिकारी किर्ती नलावडे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी कोरेगाव शहरात स्वत: रस्त्यावर उतरुन धडक कारवाई केली. केवळ दोन तासात 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
कोरेगाव शहरात कोरोनाने अद्याप शिरकाव केला नसल्याने शहरवासियांबरोबरच परिसरातील नागरिक गाफीलपणे वागत असून, शासनाने केलेल्या नियमांचे राजरोसपणे उल्लंघन करत आहेत. सातत्याने सूचना देऊन देखील फारसा फरक पडत नसल्याचे दिसून आले होते. नगरपंचायतीच्यावतीने दररोज सायंकाळी ध्वनीक्षेपकावरुन सूचना दिल्या जात होत्या, मात्र व्यावसायिक, व्यापारी व जनतेमध्ये फारसा फरक जाणवत नव्हता. विविध सामाजिक संघटनांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
गुरुवारी सकाळी प्रांताधिकारी किर्ती नलावडे यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अशोक कुंभार, मंडळ अधिकारी किशोर धुमाळ, तलाठी शंकरराव काटकर, नगरपंचायतीचे अधीक्षक प्रताप खरात, संतोष भस्मे, उध्दव घाडगे, अमर सावंत, धनाजी भुजबळ यांना सातारा जकात नाका येथे पाचारण केले. तेथे असलेल्या दुकानांमध्ये या पथकाने कारवाईला सुरुवात करताच व्यापार्यांचे धाबे दणाणले. मेन रोड या पथकाने कारवाई करताना जे व्यापारी सोशल डिस्टेन्सिंग ठेवत नाहीत, मास्कचा वापर करत नाहीत, सॅनिटायझर दर्शनी भागात ठेवत नसल्याचे निदर्शनास येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोन तासात तब्बल 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.









