विनामास्क रस्त्यावर फिरणाऱयांकडूनही दंड वसूल करण्याचा सपाटा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरात क्लोजडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा पुरविण्यासाठी दुपारी 12 पर्यंत वेळ देण्यात आली आहे. मात्र काही नागरिक अनावश्यक फिरत असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी दुपारी क्लोजडाऊन झाल्यानंतर किर्लोस्कर रोडसह शहरात विविध रस्त्यावर वाहनधारकांची विचारणा करून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीमुळे कोरोनाचा झटका आणि अनावश्यक फिरणाऱयांना दंडाचा फटका बसत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून राज्यासह सर्वत्र कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. मास्क वापरण्यासह सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण नागरिक कोरोना नियमावलीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कोरोनाची चेन तोडण्यासाठी राज्यात क्लोजडाऊन करण्यात आले आहे. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे. दुपारी 12 नंतर शहरात फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील शहरात अनावश्यक फिरणाऱयांची संख्या मोठय़ाप्रमाणात आहे. अनावश्यक फिरू नये, असे आवाहन करून ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीदेखील शहराच्या विविध भागात अनावश्यक फिरणाऱयांची संख्या अधिक आहे. दूध, भाजीपाला, काम आणि औषध आणण्याचे कारण सांगून शहरात काही युवक फिरत आहेत. त्यामुळे विविध चौकात अनावश्यक फिरणाऱयांची अडवणूक करून चौकशी करण्यात येत आहे. तसेच विनामास्क फिरणाऱयाकडून दंड वसूल करण्यासह अनावश्यक फिरणाऱयाकडून दंड वसूल करण्याचा सपाटा पोलीस प्रशासनाने चालविला आहे. विशेषतः गोगटे चौक, मध्यवर्ती बसस्थानक, राणी चन्नम्मा चौक आणि किर्लोस्कर रोड अशा विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाने वाहनधारकांना अडवून चौकशी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोणत्याही प्रकाराचे ओळखपत्र किंवा बाहेर पडण्याचे ठोस कारण न दिल्यास दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच वाहनेदेखील जप्त करण्याची कारवाई राबविण्यात येत आहे.
57 वाहनधारकांवर कारवाई : रहदारी पोलीस वाहने सील करताना.

शहरात विनामास्क तसेच विनाकारण फिरण्याऱया वाहनधारकांवर रहदारी वाहतूक पोलीस कारवाई करीत असल्याने दुचाकीस्वारांना चाप बसत आहे. कॅम्पजवळील संचयनी सर्कलनजीक बुधवारी सकाळी रहदारी पोलिसांनी विनाकारण फिरण्याऱया वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच विनाकारण फिरणाऱयांची वाहने सील करण्यात आली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी ही कठोर पावले उचलली आहेत. मात्र नागरिक कोणतीही खबरदारी न घेता फिरत आहेत. बुधवारी दिवसभरात दक्षिण रहदारी वाहतूक पोलिसांच्यावतीने विनामास्क 20 आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया एकूण 57 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच काही वाहनधारकांच्या दुचाकी देखील सील केल्या.









