ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत गेहलोत सरकारने आजपासून म्हणजेच 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारने या लॉकडाऊनला सार्वजनिक शिस्त पंधरवडा (जन अनुशासन पखवाडा) असे नाव दिले आहे. या दरम्यान केवळ अत्यवशक सुविधा सुरू असणार आहेत.

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सांगितले की, राजस्थनामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही रुग्ण वाढ रोखण्यासाठी राजस्थान सरकारने 15 दिवस म्हणजेच 19 एप्रिल ते 3 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या दरम्यान आवश्यक सेवा सोडून अन्य सर्व सरकारी ऑफिसेस बंद असणार आहेत. बाजार, मॉल, थिएटर आणि हॉटेल्स देखील बंद असणार आहेत. केवळ होम डिलिव्हरीसाठी सूट देण्यात आली आहे. मजूर घरी जावू नयेत म्हणून कन्स्ट्रक्शनची कामे सुरू ठेवण्यात आली आहेत. तसेच इंडस्ट्रीजना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.

या सेवा राहणार सुरू :
- केंद्र सरकारच्या आवश्यक सेवांशी जोडलेली कार्यालये आणि संस्था सुरू असतील. येथील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- बस स्टँड, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, एअपोर्टवरून येणाऱ्या लोकांना तिकीट दाखवून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
- राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांना प्रवास सुरू झाल्याच्या 72 तासांच्या आत केलेली आरटी पीसीआर चाचणीचे निगेटीव्ह रिपोर्ट आवश्यक आहेत.

- भाजीपाला, फळे, किराणा मालाची दुकाने सायं 5 वाजेपर्यंत सुरू असतील तर हातगाडी वरील दुकानदार सायं 7 वाजेपर्यंत विक्री करू शकतील.
- 45 वर्षांवरील नागरिक लस टोचून घेण्यासाठी बाहेर पडू शकतील. मात्र, त्यांना आपल्यासोबत ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.
- पेपर वितरणासाठी पहाटे 4 ते सकाळी 8 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तर इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडियातील लोकांना ओळखपत्र दाखवून कामासाठी ये जा करता येणार आहे.
- गरोदर महिला आणि अन्य रुग्णांना दवाखान्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.









