बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा वेग वाढत आहे. वाढती कोरोनाची संख्या सरकारची डोकेदुखी ठरली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने नियम कठोर केले आहेत. तसेच राज्यात मंगळवार दि. ३० पासून मास्क आणि सामाजिक अंतर राखण्याची सक्ती करण्यात आली आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान साथीच्या रोगाचा प्रसार वाढत आहे त्याच्या तयारी संदर्भात ठिकाणांची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री के. सुधाकर आज, मंगळवार आणि बुधवारी उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात असणार आहेत. यावेळी आरोग्यमंत्री वाढत्या रुग्णसंख्येचा आणि उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत.
दरम्यान आरोग्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुधाकर हे मणिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) याठिकाणी राज्यातील सर्वात सक्रिय प्रकरणांच्या क्लस्टरला भेट देतील. एकट्या एमआयटीमध्ये गेल्या पंधरवड्यात ८५५ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली. या महिन्याच्या सुरवातीपासून कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
दक्षिण कन्नडमध्ये १ मार्चपासून आतापर्यंत १,१६६ रुग्ण आढळले आहेत, तर त्याच काळात उडुपी जिल्ह्यात सुमारे १,५२१ लोकांना संसर्ग झाला आहे.