वृत्तसंस्था/ मुंबई, चेन्नाई
देशातील कोरोना व्हायरस संकटाला सामोरे जाण्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या परीने मदतीचा ओघ चालू ठेवला आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी कोरोनाग्रस्तांसाठी लाखो रूपयांची मदत आतापर्यंत दिलेली आहे. आता देशातील बुद्धिबळपटूंनी कोरोनाग्रस्तांसाठी तीन लाख रूपयांचा निधी जमा केला आहे.
भारतीय ग्रॅण्डमास्टर पी.हरिकृष्णा तसेच अन्य काही बुद्धिबळपटूंनी कोरोनाग्रस्तांसाठी ऑनलाईनद्वारे बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली होती. बुद्धिबळ प्रशिक्षक आर.बी. रमेश यांनी बुद्धिबळ गुरूकुलद्वारे दीड लाख रूपये तसेच पी. हरिकृष्णाने दोन लाख रूपये, के. मुरलीने 25 हजार रूपयांची रक्कम या मदतनिधी मोहिमेला दिली. ऑनलाईनद्वारे बुद्धिबळ स्पर्धेत एकूण आठ बुद्धिबळपटूंनी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेला मुंबई, नोयडा, नागपूर, हैद्राबाद या शहरातून चांगला प्रतिसाद लाभला. त्याचप्रमाणे 80 बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळ शौकिनांनी कोरोनाग्रस्तांसाठी पंतप्रधान निधीला 1.05 लाख रूपयांची मदत दिली. याच धरतीवर 11 एप्रिल रोजी ऑनलाईनद्वारे बुद्धिबळ प्रदर्शनीय स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंदसह अन्य भारताचे पाच बुद्धिबळपटूं सहभागी होणार आहेत.









