युवा गोल्फपटू अर्जुन भाटीचे मोलाचे योगदान, पंतप्रधान सहायता निधीसाठी 4 लाख 30 हजारांचा दिला निधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात थैमान घातलेल्या कोरोनोग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक क्षेत्रातून मदतीचा हात पुढे येत आहेत. कोरोनाच्या लढाईसाठी अनेक दिग्गज खेळाडू व क्रीडा संघटनांनी राज्य व पंतप्रधान सहायतान निधीसाठी मदत केली आहे. यामध्ये, दिल्लीचा युवा गोल्फपटू अर्जुन भाटीने आजपर्यंत जिंकलेल्या 102 ट्रॉफींचा लिलाव करत मिळालेली 4 लाख 30 हजार रुपयांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीसाठी दिली आहे. कोरोनाविरुद्ध लढय़ात 15 वर्षीय अर्जुनच्या या मोलाच्या योगदानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्याचे विशेष कौतुक केले आहे.
देशात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणान निधीची गरज आहे. पंतप्रधान निधीसाठी देशातील अनेक क्रीडापटूंनी पुढाकार घेतल्यानंतर ग्रेटर नोएडात राहणाऱया अर्जुन भाटीने आजपर्यंत देश व विदेशात जिंकलेल्या ट्रॉफीचा लिलाव करत मिळालेली रक्कम गरजूंना दिली आहे. ‘देश-विदेशात जिंकलेल्या ट्रॉफी या संकटकाळात मी 102 लोकांना दिल्या आहेत. त्यातून मिळालेले एकूण 4 लाख 30 हजार रुपये पीएम केअर्स फंडात मदत म्हणून दिले. हे ऐकून आजी रडली आणि म्हणाली तु खरंच अर्जुन आहेस. देशातील नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी तुझ्या ट्रॉफींचा उपयोग झाला. ट्रॉफी काय पुन्हा मिळतील.’ असे ट्विट करत अर्जुनने केले आहे.
विशेष म्हणजे, अर्जुनच्या आजीने मागील आठवडय़ात एक वर्षांची पेन्शन गरजू लोकांच्या मदतीसाठी दान केली आहे. अर्जुनने या संदर्भात सोशल मीडियावर माहिती दिली. 15 वर्षांच्या अर्जुनने आतापर्यंत 150 गोल्फ टूर्नामेंट खेळल्या आहेत. अलीकडेच कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड गोल्फ चॅम्पियनशिपचे अर्जुनने जेतेपद पटकावले आहे.









