नाल्यांमधून अन्न शोधताहेत लोक : कीडे-साप अन् उंदिर खाऊन गुजराण
आशियाई देश असलेल्या म्यानमारमध्ये कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. लोक साप, उंदिर आणि कीडे खाऊन गुजराण करत आहेत. कोरोनामुळे मार्च महिन्यात जगभरात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. परंतु स्थिती नियंत्रणात आल्यावर टाळेबंदी हटविण्यात आली असता रुग्ण पुन्हा वाढू लागले आहे. याचदरम्यान म्यानमारमध्ये सप्टेंबर महिन्यात लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आणि यातून उपासमारीची स्थिती ओढवली आहे.
पहिल्यांदाच टाळेबंदी लागू करण्यात आली तेव्हा सॅलडचा स्टॉल बंद करावा लागला. खाद्यसामग्री जमविण्यासाठी दागिने गहाण ठेवावे लागले. तर दुसऱयांदा टाळेबंदी लागू केली असता पुन्हा स्टॉल बंद करणे भाग पडले. या कालावधीत कपडे आणि भांडी विकून अन्न मिळवावे लागल्याचे उद्गार यांगून येथे राहणाऱया 36 वर्षीय मा सून हिने काढले आहेत.
नाल्यांमध्ये अन्नाचा शोध
विकण्यासाठी काहीच शिल्लक न राहिल्याने पतीसोबत शहरी भागांमध्ये वाहणाऱया नाल्यांमधून अन्न शोधण्याची वेळ आली आहे. येथील बहुतांश लोक उंदिर आणि साप खात असल्याचे मा सून यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाचे अधिकारी नेय मिन टुन यांनी क्षेत्रात 40 टक्के लोकांना सहाय्य करण्यात आल्याचा दावा केला आहे.
41 हजारांहून अधिक रुग्ण
दक्षिण आशियात कोरोना विषाणूचा प्रकोप झेलणाऱया देशांमध्ये म्यानमारचाही समावेश आहे. 5.44 कोटी लोकसंख्या असलेल्या म्यानमारमध्ये आतापर्यंत 41 हजारांहून अधिक बाधित सापडले आहेत. तर 1 हजारांपेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.









