प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा व्हिडीओ संदेश जारी
वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या सूत्रांकडून रविवारी देण्यात आली. ट्रम्प यांचा ताप वाढत चालला असून रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असल्याने चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. प्रकृती ढासळत असल्याने गेले दोन-तीन दिवस निवासस्थानीच उपचार घेत असलेल्या ट्रम्प यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, उपचाराअंती आता आपल्या प्रकृतीत सुधारणा होत असून आराम वाटत असल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. फर्स्ट लेडी मेलेनिआ ट्रम्प यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान रविवारी त्यांनी जनतेला संदेश देण्यासाठी रुग्णालयातून व्हिडीओ जारी केला आहे. कोरोनावर मात करून आपण लवकरच कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आगामी काळ कसोटीचा असून परीक्षा घेणारा आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक महिना असताना ट्रम्प यांना कोरोनामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही चर्चा सुरू होत्या. मात्र, आता आपली प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात दाखल केले तेव्हा प्रकृती ठीक नव्हती. मात्र, आता आराम वाटत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. येणारे काही दिवस प्रकृतीच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. आपण लवकरच घरी परतणार असून कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले.









