वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरोनासंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी पश्चिम बंगालमधील बांकुडा मतदारसंघाचे भाजप खासदार सुभाष सरकार यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते जयदीप चट्टोपाध्याय यांनी तक्रार दिली होती. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारवेळी हलगर्जीपणा करण्यात आल्याचा दावा सुभाष सरकार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. सरकार हे स्वत: डॉक्टर आहेत. दोन मृतदेहांवर झालेल्या अंत्यसंस्कारबाबत त्यांनी केलेले विधान चुकीचे आहे. कोणताही अधिकृत अहवाल नसताना त्यांनी मृतांना कोरोना झाल्याची अफवा पसरवून समाजात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर मृत व्यक्तींच्या कोरोना चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने अंत्यसंस्कार केलेच कसे, असा सवाल खासदार सरकार यांनी केला आहे.









