जागतिक पशुवैद्यक संघटना दरवषी एप्रिल महिन्याचा शेवटचा शनिवार हा जागतिक पशुवैद्यक दिन म्हणून साजरा करते. एकूणच पशुवैद्यकांचे पशूसह मानवी आरोग्यमधील महत्त्व, त्याचा सहभाग हा सर्व जनतेसमोर यावा, त्याची चर्चा व्हावी आणि एकूणच या दिनाचे औचित्य साधून लोकांचे प्रबोधन व्हावे म्हणून हा दिन साजरा केला जातो. यावषी जगात सुरू असलेल्या कोविड 19च्या पार्श्वभूमीवर जगातील सर्व पशुवैद्यकांनी कसा प्रतिसाद दिला, सहभाग नोंदवला या थीमवर साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोना हा जगात पहिल्यांदा 26 डिसेंबर 2019 रोजी चीनमध्ये वुहान प्रांतात आढळून आला. त्यानंतर हळूहळू सर्व जगात पसरला आणि त्याच्या लाटा सुरू झाल्या. दि. 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने याला जागतिक महामारी, जगद्व्यापी साथ म्हणून जाहीर केले. मग जगातील सर्व संस्था, शास्त्रज्ञ, देश एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करून या रोगावर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला. या रोगास कारणीभूत असणारा विषाणूचा स्रोत हा कोणत्या प्राण्यातून आला असावा याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे. आता दुसरी लाट सुरू झाली आहे. विषाणूचे उत्परिवर्तन सुरू आहे. सोबत लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन वापर सुरू आहे. परदेशातूनदेखील काही नवीन कंपन्यांची लस आयात करण्यात येत आहे. एकूणच आता लसीकरणावर मोठय़ा प्रमाणात भर दिला जात आहे.
जागतिक आरोग्य संघटना या रोगाच्या विषाणूबाबत संशोधन करत आहे. एकूणच या विषाणूचा संसर्ग कोठून आणि कसा झाला असावा याबाबत अजूनही संदिग्धता आहे. विषाणूच्या अभ्यासावरून वटवाघुळ आणि खवल्या मांजर या प्राण्यांच्या माध्यमातून मानवात पसरला असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. जगात काही ठिकाणी प्रायोगिक स्तरावर आणि थेट जनावरातसुद्धा कोविडची लक्षणे आढळून आली आहेत. गाय, म्हैस, बैल आणि कोंबडय़ा सोडून इतर प्राण्यांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आली आहेत. काही कुत्र्यांच्या प्रजाती, पाळीव मांजरे, सिंह, वाघ जे कोविडग्रस्त लोकांच्या सहवासात आले ते सर्व आजारी पडले, त्यांनी कोविडची लक्षणे दाखवली. अशा कोविडग्रस्त जनावरांपासून कोविड जनावरात आणि माणसातदेखील पसरू शकतो या शक्मयतेला दुजोरा मिळतो. त्याचबरोबर कोविडची कोविशिल्ड व्हॅक्सिन निर्मितीसुद्धा पशुवैद्यक शास्त्राच्या जवळ जाते. ती निर्माण करण्यासाठी चिंपांजी या प्राण्याचा वापर केला आहे. अल्बर्ट बोर्ला हे एक पशुवैद्य आहेत आणि फायझर या औषध कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी फायजरच्या कोविड लसीच्या निर्मितीमध्ये फार मोठा पुढाकार घेतला आहे. एकूणच आज जगात 70 टक्के मानवी रोगास कारणीभूत असणारे रोगजंतू हे जनावरातून येतात. ते सर्व प्राणीजन्य आजार आहेत. चीनमध्ये सापडलेला पहिला रोगी हा मासळीबाजारात जिवंत प्राणी विकणारा होता. तो साप, खवले मांजर विकत होता हे आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही. आता वन हेल्थ कन्सेप्टखाली काम करणारे वैद्यकीय, पशुवैद्यकीय आणि पर्यावरण तज्ञ यांनी एकत्रितपणे औषध चाचणी, लस निर्मिती करताना सर्व शास्त्रज्ञांना लागणाऱया प्रयोगशाळेतील प्राण्यांचा पुरवठा आणि संबंधित संशोधनात मदत करत आहेत. त्याचबरोबर ज्या तपासण्या एफडीएने शिफारस केलेल्या टेस्ट आपण नेहमी ऐकतो किंवा वाचतो त्या आरटीपीसीआर, ऍंटिजन टेस्ट, पीसीआर या सर्व चाचण्या देशातील निशाद भोपाळ, आयव्हीआरआय इज्जतनगर, पशुवैद्यकीय महाविद्यालय मथुरा या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत करत आहेत. जनावरांच्या साथीच्या आजारात वापरले जाणारे विलगीकरण, विजनवास या बाबींचा वापर यावेळी करण्यात येत आहे. प्राणीजन्य आजाराच्या साथीत नेहमी प्राण्यामधील रोगांचे नियंत्रण महत्त्वाचे असते. अमेरिकेत ज्यावेळी एप्रिल 2020 मध्ये न्यूयॉर्क येथील प्राणी संग्रहालयात वाघ हा कोविड सकारात्मक आला त्यावेळी आपल्या देशातील आयव्हीआरआय इज्जतनगर, निशाद भोपाळ, एनआरसीइ हिसार या संस्थांनी देशातील प्राणी संग्रहालयातील नमुने तपासणी करण्यात पुढाकार घेतला आणि तपासणी केली. त्यांना कुठेही कोविडचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. जागतिक साथरोग काळात जनावरांचे स्थलांतर रोखले जाते, जनावरांचा संपर्क रोखला जातो.
एकूणच जगात 1.67 दशलक्ष प्रकारचे ज्ञात-अज्ञात विषाणू हे जनावरातील रोगास कारणीभूत आहेत. पैकी जवळजवळ 6,31,000 ते 8,27,000 विषाणू हे मानवामध्ये रोग उत्पन्न करू शकतात. यावर काम करण्यासाठी ‘ग्लोबल व्हायरोम प्रोजेक्ट’ येऊ घातला आहे त्यामध्ये जागतिक पातळीवर मोठय़ा प्रमाणात वैद्यकीय, पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ नेमण्यात येणार आहेत. जवळ जवळ जगात चौदाशे प्रकारची वटवाघळे आहेत. मोठय़ा प्रमाणात या वटवाघळाद्वारे प्राणीजन्य आजाराचे संक्रमण होत असते. याद्वारे मोठय़ा प्रमाणात विषाणूचे उत्परिवर्तन, जीन संयोजन, जीन डुप्लीकेशन घडून येते. यावर पशुवैद्यकांनी मोठय़ा प्रमाणात लक्ष दिले आहे. महाराष्ट्रातदेखील नागपूर येथे ‘वन हेल्थ कन्सेप्ट’खाली प्रयोगशाळा उभारणी सुरू केली आहे. एकूणच जगात, देशपातळीवर, राज्य पातळीवर सर्व पशुवैद्यक हे अत्यावश्यक सेवेत नसतानादेखील मोठय़ा प्रमाणात पशुवैद्यकीय सेवा देत आहेत. जीवावर उदार होऊन पशुपालकांना त्यांची दैनंदिन अडी-अडचणीत पशुवैद्यकीय सेवा देणे चालू ठेवले आहे.
एकूणच येणाऱया काळात एकूण मानव कल्याणासाठी ‘वन वर्ल्ड वन हेल्थ’साठी पशुवैद्यकांचे योगदान फार मोठे राहणार आहे हे निर्विवाद सत्य आपण आजच्या जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त मान्य करून त्या पशुवैद्यकांना वेगवेगळय़ा मार्गाने प्रोत्साहित करूया इतकेच.
डॉ. व्यंकटराव घोरपडे, सांगली








