1 लाखाचा दंड : आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांचा इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाविरुद्धच्या लढय़ात सहभागी असणाऱया कोरोना वॉरियर्सवर हल्ला केलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. हल्ला करणाऱयांना 5 वर्षांचा कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे.
बळ्ळारी जिल्हा इस्पितळात डॉक्टरांवर हल्ला करणाऱया कुटुंबीयांचा निषेध नोंदविताना डॉ. सुधाकर म्हणाले, कोरोना वॉरियर्सवर हल्ला करणाऱयांच्या शिक्षेसाठी सरकारने कायदा केला आहे. हल्ला करणाऱयांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा व 1 लाखाचा दंड ठोठावण्यात येईल. डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करणे योग्य नाही. चुका झाल्या असतील तर तक्रार दाखल करा. तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱया डॉक्टरांवर हल्ला झाल्याची घटना बळ्ळारी जिल्हा इस्पितळात घडली आहे. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी संतापाच्या भरात डॉक्टरांवर हल्ला केला आहे. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात चित्रित झाली आहे.
1,763 डॉक्टरांच्या नेमणुका
राज्यातील आरोग्य क्षेत्र आणखी बळकट करण्यासाठी एकूण 1,763 डॉक्टर्स आणि सामान्य वैद्यकीय कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्तर कर्नाटकाला नेमणुकीत प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे.
उत्तर कर्नाटकाला प्राधान्य
राज्यात 1,763 वैद्यकीय कर्मचाऱयांच्या नेमणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 715 तज्ञ डॉक्टर, 57 जनरल सर्जन, 75 मेडिसिन वितरक, 17 रेडियॉलॉजिस्ट, 153 बालरोग तज्ञ, 142 देखभाल कर्मचारी, 40 ईएनटी, 35 चर्मरोग तज्ञ तसेच 1,048 सामान्य वैद्यकीय कर्मचाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. उत्तर कर्नाटक भागातील बेळगाव, गदग, हुबळी, रायचूर या जिल्हय़ांना नेमणुकीवेळी प्राधान्य देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सुधाकर यांनी दिली.









