इंदौरमधील प्रकार, मोबाईलही तोडला, सर्वेक्षण करणाऱया पथकाला चाकुने धमकावले
वृत्तसंस्था / इंदौर
कोरोना संसर्गाविरोधात लढा देणाऱयांमध्ये आरोग्य सेवेतील कर्मचाऱयांचा महत्त्वाची भूमिका आहे. मात्र अनेक ठिकाणी त्यांना लोकांच्या असहकार्य आणि धमकावण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे. इंदौरमध्ये आरोग्य विभागाच्या पथकावर काही समाजकंटकांनी अशाचप्रकारे हल्ला करत महिला कर्मचाऱयांना मारहाण केली, चाकूचा धाक दाखवत धमकावले आणि त्यांच्याकडील मोबाईही तोडल्याचे समोर आले आहे. शहरातील विनोबानगर परिसरात एका गुंडाने हा निषेधार्ह कृत्य केले आहे.
दरम्यान, या गुंडाला पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा खासदार हेमा मालिनी यांनी ट्विटरद्वारे केली आहे. या गुंडाने आरोग्य पथकातील महिलेला धक्का देऊन खाली पाडून मारहाण केली तसेच शिवीगाळही केली. हे पथक आरोग्य सर्वेक्षणाअंतर्गत परिसरात तपासणीसाठी गेले होते. मात्र या गुंडाने त्यांचा मोबाईलही तोडला. या महिलेला मदत करण्यास आलेल्यांनाही या गुंडाने चाकुच्या धाक दाखवून हल्ला केला. हा आरोपी दारुविक्री करत असल्याचे समोर आले असून त्याच्यावर गांजा विकण्याचाही आरोप आहे. परिसरातील अनेकांबरोबर त्याचा वाद झाल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.या घटनेत एका महिलेसह चारजण जखमी झाले आहेत.









