आशिया अन् दक्षिण अमेरिकेतील संशोधनातून खुलासा : डेंग्यूची लस ठरणार उपयुक्त
कोरोना विषाणूशी झगडणाऱया पूर्ण जगासाठी दिलासादायक बातमी आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार डेंग्यूचा फैलाव आणि कोरोना विषाणू यांच्यातील संबंध आढळला आहे. डेंग्यूचा ताप कोरोना विषाणू महामारीपासून बचावत रक्षा कवच ठरत असल्याचे या संशोधनात आढळून आले आहे. डेंग्यू लोकांना काही प्रमाणापर्यंत रोगप्रतिकारकशक्ती देत असून त्याद्वारे कोरोना संक्रमणाला सामोरे जाताना मदत होत आहे.
डय़ूक युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक मिगुइल निकोलेसिस यांनी 2019 आणि 2020 मध्ये डेंग्यू आजारासह कोरोनाच्या भौगोलिक फैलावाचा तुलनात्मक आकडा सादर केला आहे. ज्या देशांमध्ये यंदा किंवा मागील वर्षी डेंग्यूचा प्रकोप अत्यंत वेगाने फैलावला होता, तेथे कोरोनाचा संसर्ग कमी असून रुग्णही कमी आढळून येत असल्याचे निकोलेसिस यांना आढळून आले आहे.
डेंग्यू अँटीबॉडी अन् कोरोना

ही असाधारण माहिती डेंग्यू विषाणू अँटीबॉडी आणि कोरोना विषाणूमधील एका संबंधाची शक्यता दर्शविणारी आहे. जर हे खरे ठरल्यास डेंग्यूचा संसर्ग किंवा त्याच्या खात्म्यासाठी निर्माण करण्यात आलेली एक प्रभावी आणि सुरक्षित लस कोरोना विषाणूपासून काही प्रमाणात सुरक्षा देऊ शकते असे ब्राझीलमध्ये झालेल्या अध्ययनात म्हटले गेले आहे. डेंग्यू आणि कोरोना विषाणूमधील हा संबंध दक्षिण अमेरिकेच्या अन्य हिस्स्यांमध्ये तसेच आशिया आणि प्रशांत महासागराच्या देशांमध्येही संशोधकांना आढळून आला आहे.
प्रतिरक्षणाशी संबंध
ज्या लोकांच्या रक्तात डेंग्यूची अँटीबॉडी आहे, ते कोरोनाच्या अँटीबॉडी टेस्टमध्ये चुकीच्या पद्धतीने पॉझिटिव्ह दिसून येत असल्याने ही आकडेवारीही अत्यंत महत्त्वाची आहे. संबंधितांना कोरोना संसर्ग झाला नसतानाही त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत होती. हा दोन्ही विषाणूंदरम्यान प्रतिरक्षणाशी संबंधित काही संबंध आहे या गोष्टीचा संकेत असल्याचे उद्गार प्राध्यापकांनी काढले आहेत.
ब्राझीलमध्ये 44 लाख रुग्ण
दोन्ही विषाणू वेगवेगळय़ा पार्श्वभूमीचे असल्याने त्यांच्यात संबंध असल्याचे मानलेच जात नव्हते. परंतु हे नवे संशोधन लवकरच एका विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशित केले जाणार आहे. या संशोधनाद्वारे डेंग्यूला तोंड देणाऱया ब्राझीलमध्ये कोरोना विषाणूमुळे जगाच्या अन्य भागांच्या तुलनेत कमी मृत्यू होत असल्याचे मांडले जाणार आहे. ब्राझीलप्रमाणेच भारतातही मोठय़ा प्रमाणावर मागील तसेच चालू वर्षात डेंग्यूचा फैलाव झाला आहे.
कोरोना लस वितरणासाठी 156 देश एकत्र
जागतिक आरोग्य संघटनेचा पुढाकार

जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यात तयार होणाऱया कोरोनावरील लसीच्या पुरवठा तसेच वितरणाची योजना तयार केली आहे. या योजनेला कोवॅक्स स्कीम नाव देण्यात आले आहे. योजनेशी जगातील 156 देश जोडले गेलेले आहेत. यात जगातील 64 स्वयंवित्तपोषित आणि आर्थिकदृष्टय़ा मजबूत देशही सामील आहेत. परंतु चीन आणि अमेरिका या यादीत समाविष्ट नाही. डब्ल्यूएचओ याकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर लसवितरण करणारी संस्था गावीसोबत मिळून काम करणार आहे. लस पोहोचविणे आणि त्याच्या वितरणात कुठलीच गडबड होऊ नये हे या माध्यमातून निश्चित केले जाणार आहे. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रोस गेब्रिसिएस यांनी योजनेची घोषणा केली आहे. ही कुठलीच धर्मादाय योजना नसली तरीही सर्व देशांच्या हिताची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ट्रम्प ठरले खोटारडे

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंबद्दल असत्य माहिती दिली आहे. अमेरिकेतील मृत्यूदर जगात सर्वात कमी असल्यचा दावा ट्रम्प यांनी ओहियो येथील प्रचारसभेत केला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार मृत्यूदराप्रकरणी अमेरिका जगातील 195 देशांमध्ये 53 व्या स्थानावर आहे. अमेरिकेत मृत्यूदर 2.9 टक्के आहे.
पंतप्रधानांनी मागितली माफी

चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबीज सोमवारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनाच्या काळात निर्बंध शिथिल करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. अशाप्रकारचा निर्णय पुन्हा घेतला जाणार नाही. उन्हाळय़ापर्यंत महामारीवर नियंत्रण मिळविण्यात येणार असल्याचे बाबीज यांनी म्हटले आहे.
क्षी जिनपिंगवर टीका, 18 वर्षांचा तुरुंगवास

कोरोना महामारीला हाताळण्याच्या मुद्दय़ावरून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यावर उघड टीका करणे चीनच्या एका दिग्गज उद्योजकाला चांगलेच महागात पडले आहे. सरकारी रियल इस्टेट कंपनीचे माजी अध्यक्ष रेन झिकियांग यांना कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी 18 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. तत्पूर्वी चिनी अब्जाधीशाला सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षातून हाकलण्यात आले होते. नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱया लोकांना चीनमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप ठेवून तुरुंगात डांबले जाते.
डोळय़ांमधून शरीरात शिरू शकतो कोरोना
कंजेक्टिवाइटिसची लक्षणे दिसून आल्यास सतर्क व्हा : चिनी वैज्ञानिकांचा दावा

कोरोना विषाणू डोळय़ांमधूनही शरीरात शिरू शकतो, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. मेडिकल जर्नल ऑफ वायरोलॉजीमध्ये प्रकाशित संशोधनानुसार कोरोनाला शरीरात पोहोचण्यासाठी डोळे एक महत्त्वाचा मार्ग आहे. अलिकडेच झालेली अनेक संशोधनेही याची पुष्टी देतात.
हे नवे संशोधन चीनच्या शुझाउ झेंगडू रुग्णालयाच्या संशोधकांनी केले आहे. जे लोक दिवसात 8 तासांपेक्षा अधिक काळ चष्मा लावतात, त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डोळय़ांमधून संसर्गाचा धोका

हवेत असलेले कोरोनाचे विषाणू सर्वाधिक नाकाद्वारे शरीरात पोहोचतात. नाक आणि डोळय़ात एकाच प्रकारचे मेम्ब्रेन लाइनिंग असते. जर कोरोना विषाणू दोन्ही पैकी कुठल्याही एका हिस्स्य़ाच्या म्यूकल मेम्बेनपर्यंत पोहोचल्यास तो सहजपणे संक्रमित करू शकतो. याच कारणामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर रुग्णांमध्ये कंजेक्टिवाइटिस सारखी लक्षणे दिसू लागतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
276 जणांवर संशोधन
चिनी संशोधकांनी 276 जणांवर संशोधन केले आहे. ज्या लोकांना चष्मा घातलेला नव्हता, त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक होता असे आढळून आले आहे. संशोधनादरम्यान केवळ 16 जणांनी चष्मा घातला होता. चष्मा परिधान करणाऱया लोकांचा आकडा कमी आहे, परंतु चष्मा परिधान केल्यास थेटपणे होणाऱया संसर्गाचा धोका कमी होतो ही बाब स्पष्ट असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
चष्मा उपयुक्त
चष्मा परिधान करत असल्यास तो एका अडथळय़ाप्रमाणे काम करतो आणि संक्रमित ड्रॉपलेट्सना डोळय़ात पोहोचण्यापासून रोखतो. याच कारणामुळे चष्मा लावणे अधिक उपयुक्त असून तो चारही बाजूने डोळय़ांना सुरक्षा प्रदान करतो.









