पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला – ‘एम-योगा’ ऍपचे अनावरण
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोना संकटात योगाचं महत्व अधोरेखित केले. योगसाधनेमुळे निरोगी आयुष्य, सामर्थ्य आणि सुखी जीवन मिळते असा दावा करत कोरोना विरुद्धच्या लढाईतही योग अनमोल भूमिका निभावत असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. याचदरम्यान ‘एम-योगा’ ऍपचे अनावरणही करण्यात आले. कोरोना संसर्गामुळे यंदाही योग दिनाचे कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.
जगभरात सोमवारी सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगाने लोकांमध्ये कोरोनाशी लढण्याचा विश्वास निर्माण केला असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुखी आयुष्यासाठी योगा महत्वाचा असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. क्लास सुरू होण्याआधी अनेक शिक्षक मुलांकडून 15 मिनिटे योग करून घेत असल्यामुळे मुलांची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोना विरुद्धच्या लढाईत हा खूप चांगला उपक्रम असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
आज संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. कोरोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे,’’ असे मोदींनी सांगितले. आता जगाला ‘एम-योगा’ ऍपची शक्ती मिळणार असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. या ऍपमध्ये कॉमन योग प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षणाचे अनेक व्हिडीओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असणार असल्याने त्याचा योग्य लाभ जनतेने घ्यावा, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही, असे मोदी म्हणाले. जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढय़ा अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवल्याचे पंतप्रधानांनी नमूद पेले.









