आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांचा इशारा : कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेंगळूर
गत काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने दुसऱया लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारी घेऊन सर्वसामान्यांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा कोरोना वाढल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला. बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, आरोग्य खात्याचे कर्मचारी तुम्हाला लस देतील. राज्य सरकार कोरोना नियंत्रणासाठी विविध नियम जारी करेल. मात्र, प्रत्येकांमध्ये याची जागृती असणे गरजेचे आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून यात्रा, कार्यक्रमांवर निर्बंध आणावेत. एखाद्यावेळेस राज्यात कोरोना वाढल्यास यावर नियंत्रण आणणे सरकारलाही अवघड जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत तज्ञांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या आरोग्याबाबत आरोग्य खात्याने सरकारला सल्ला दिला आहे. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आमचे कर्तव्य आहे. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालये सुरू ठेवाव्यात की नाही? याबाबत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असेही सुधाकर म्हणाले.
इतर राज्यातून येणाऱया प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सीमाभागात कठोर पावले उचलण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. सीमाभागातील तपासनाक्यावर निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच राज्यात प्रवेश दिला जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेला आम्ही सामोरे गेलो आहोत. त्यामुळे दुसरी लाट येण्यापूर्वी खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार सरकारच्या कोरोना मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक आहे, असे मंत्री सुधाकर यांनी सांगितले.
राज्यभरातच रुग्णांच्या संख्येत वाढ
राज्यात कोरोनाच्या दुसऱया लाटेबाबत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने बेंगळुरात कठोर उपाययोजना हाती घेण्याचा विचार चालविला होता. पण, संपूर्ण राज्यातच बाधितांची संख्या वाढत असल्याने भीती निर्माण झाली आहे. उडुपी, गुलबर्गा, म्हैसूर, चामराजनगर, बागलकोटसह इतर भागात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाला अनेक सूचना दिल्या आहेत. तपासणी केंद्रे वाढविण्यासह लसीकरण वाढविण्यासाठी आरोग्य खात्याचे कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांची मदत घेतली जाणार आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.









