संकेश्वर नगरपरिषद बैठकीत निर्णय : लसीकरणासाठी नियोजन करणार
प्रतिनिधी / संकेश्वर
‘कोरोना’ शंभर टक्के नियंत्रणाखाली आणण्यासाठी राज्य शासन युद्धपातळीवर स्थानिक पातळीवर सक्षम नियोजन करीत आहे. यापार्श्वभूमीवर नुकतीच नगरपरिषदच्या सभागृहात शासकीय वैद्याधिकारी व नगरसेवक व कर्मचाऱयांची सामूहिक बैठक पार पडली. यावेळी शहरातील 23 वॉर्डांमध्ये कोरोना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नगरसेवक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व नगरपरिषद कर्मचाऱयांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
60 वर्षांवरील नागरिकांना प्रामुख्याने लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय 40 वर्षांवरील ज्यांना मधुमेह, रक्तदाब असे आजार आहेत. त्यांच्यातही कोरोना लसीसंदर्भात जागृती निर्माण करुन प्रत्येक कुटुंबातील सर्वांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक वॉर्डासाठी नगरसेवक, आशा कार्यकर्त्या, नगरपरिषद कर्मचारी व वैद्याधिकारी अशांची एक टीम करुन लसीकरणाबाबत जागृती करणे. लस घेण्यासाठी त्यांची मानसिकता तयार करुन वाहनाद्वारे त्यांना लस देण्यासाठी समुदाय आरोग्य केंद्रात आणणे, लस दिलेल्या नागरिकांना 20 मिनिटे इस्पितळात थांबवून घेऊन लसीचा परिणाम जाणून त्या नागरिकांना पुन्हा घरी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. शहरवासियांनी मनात कोणतीही शंका, भीती न आणता कोरोना लस घ्यावी व कोरोनाला कायमचेच पळवून लावू या, यासाठी प्रत्येकांनी लस घ्यावी, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीला नगराध्यक्षा सीमा हतनूरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती चेअरमन सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय नष्टी, संजय शिरकोळी, डॉ जयप्रकाश करजगी, गंगाराम भुसगोळ, डॉ मंदार हावळ, समुदाय आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दत्तात्रय दोडमनी, डॉ पौर्णिमा तल्लूर, नगरपरिषद मुख्याधिकारी जगदीश ईटी, आरोग्य निरीक्षक प्रकाशगौडा पाटील, अभियंता आर. बी. गडाद व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.









