सेचेनोव्ह विद्यापीठाचा सर्व चाचण्या यशस्वी ठरल्याचा दावा : अमेरिकेसह अनेक देशांना याप्रकरणी टाकले मागे
कोरोना संसर्गावरील लसनिर्मितीत रशियाने बाजी मारली आहे. कोरोना विषाणूवरील लस तयार केली असून सर्व चाचण्याही यशस्वी ठरल्या आहेत असा दावा रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने केला आहे. हा दावा खरा ठरल्यास कोरोनावरील ही पहिली लस ठरणार आहे. अमेरिकेसमवेत अनेक देश लसनिर्मितीच्या प्रयत्नात आहेत. यातील अनेक लसींची चाचणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. परंतु रशियाने पहिली लस तयार करून मोठी आघाडी मिळविली आहे.
लवकरच उपलब्ध

मानवी आरोगाच्या सुरक्षेसाठी कोविड-19 ची लस यशस्वीपणे तयार करणे हा या अध्ययनाचा मुख्य उद्देश होता. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लसीच्या सर्व पैलूंची चाचणी करण्यात आली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती सेचनोव्ह विद्यापीठाच्या इन्स्टीटय़ूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी, ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झेंडर लुकाशेव्ह यांनी दिली आहे.
अत्याधुनिक संशोधन केंद्र
सेचेनोव्ह विद्यापीठाने शैक्षणिक संस्थेसह वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन केंद्राच्या स्वरुपात आतापर्यंत उल्लेखनीय काम केले आहे. महामारीच्या स्थितीत औषध विकसित करण्यासारख्या महत्त्वपूर्ण कार्याकरता विद्यापीठ सक्षम आहे. कोरोना लसीवरील चाचणीत सामील स्वयंसेवकांच्या दुसऱया समुहाला 20 जुलैपासून सुटी दिली जाणार असल्याचे तारसोव यांनी सांगितले आहे. मानवी चाचणीत लस उपयुक्त ठरल्याचे सांगण्यात आल्याने पूर्ण जगाचे लक्ष आता वेधले गेले आहे.
18 जूनपासून चाचणी
विद्यापीठाने 18 जून रोजी रशियाच्या गेमली इन्स्टीटय़ूट ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीकडून निर्मित लसीची चाचणी सुरू केली होती. सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोना विरोधात जगातील पहिल्या लसीची स्वयंसेवकांवर चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्याचा दावा इन्स्टीटय़ूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसीन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तारसोव यांनी केला आहे.
मास्कची सक्ती नाही!

मॉस्कोमध्ये मास्क परिधान करण्याची सक्ती नसेल. नव्या बाधितांचा आकडा घटल्याने मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबायनिन यांनी हा निर्णय घेतला आहे. परंतु नागरिकांना नदीकाठावर जाण्यास बंदी असणार आहे. उष्णता वाढल्याने लोक मोठय़ा संख्येने नदीकाठावर पोहोचू लागले आहेत. 15 जुलैपासून रशियाकडून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाऊ शकते.
सिंगापूरमध्ये 178 नवे रुग्ण

सिंगापूरमध्ये 178 कोरोनाबाधितांची भर पडल्याने एकूण आकडा 45,961 वर पोहोचल आहे. बहुतांश बाधितांमध्ये स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमध्ये 177 जण स्थलांतरित कामगार आहेत. भारतातून 6 जुलै रोजी परतलेल्या व्यक्तीला लागण झाली आहे. या बाधिताला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
71 निदर्शकांना सर्बियात अटक
सर्बियात शनिवारी रात्री टाळेबंदीला विरोध करणाऱया 71 जणांना अटक करण्यात आली आहे. सर्बियात मागील 4 दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. अध्यक्ष अलेक्सेंडर वुकिक यांच्या टाळेबंदीच्या निर्णयावर जनता नाराज आहे. पोलीस आणि निदर्शकांदरम्यान शुक्रवारी झटापट देखील झाली आहे. कोरोनाचा धोका पाहता टाळेबंदी मागे घेतली जाणार नाही. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अध्यक्ष वुकिक यांनी बजावले आहे. सर्बियात संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नौसैनिकांना लागण

जपानच्या ओकिनावा बेटावर तैनात 60 पेक्षा अधिक अमेरिकन नौसैनिकांना कोरोनाची लागण झाली आहे. सैनिकांचा चाचणी अहवाल रविवारी प्राप्त झाल्याचा दावा अधिकाऱयांनी केला आहे. ओकिनावाच्या गव्हर्नरांनी अमेरिकन मिलिट्री कमांडरला संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची सूचना केली आहे. नौसैनिक स्थानिकांमध्ये मिसळत असल्याने जपानमध्ये संसर्ग वाढण्याची भीती आहे.
8 आरोग्य कर्मचारी बाधित

मेलबर्न शहरातील आल्प्रेड रुग्णालयाच्या 8 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. या बाधितांवर उपचार केले जात आहेत. ही घटना समूह संसर्गाची असू शकते. कर्मचाऱयांना सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. मेलबर्नमध्ये 29 जुलैपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे.
अमेरिका : डिस्ने ऍम्यूजमेंट पार्क खुले

अमेरिकेत मागील 4 दिवसांपासून प्रतिदिन 60 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोनाबाधित सापडत आहे. दिवसभरात तेथे 61 हजार 719 रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढूनही फ्लोरिडा येथील डिस्नेचे मॅजिक किंग्डम आणि ऍनिमल किंग्डम ऍम्यूजमेंट पार्क खुले करण्यात आले आहे. डिस्नेची सर्व केंद्रे मार्च महिन्यात महामारी फैलावल्यावर बंद करण्यात आली होती. डिस्नेच्या जगभरातील सर्वच केंद्रांमध्ये आता लोकांची उपस्थिती वाढू लागली आहे.









