दिल्लीत प्रतिदिन 20 हजारांपेक्षा अधिक चाचण्या : आरोग्यव्यवस्थेची स्थिती सुधारली, बेड्स वाढविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना महामारीच्या दरम्यान केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या सहकार्याचे कौतुक केले आहे. दिल्लीत सद्यकाळात 13 हजार 500 बेड्सची सुविधा आहे. यातील 6,500 अधिग्रहित करण्यात आले आहेत. दिल्ली सरकार प्रतिदिन 20 हजार चाचण्या करत आहे. कोरोना विरोधी लढाईत केंद्र सरकारने आम्हाला हात पकडून चालणं शिकविलं असल्याचे केजरीवाल
म्हणाले.
दिल्लीत चालू महिन्याच्या प्रारंभापासून कोरोना संसर्गाची स्थिती बिघडू लागली होती. वाढते संकट पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून महत्त्वाचे निर्णय घेतले होते. डॉ. विनोद पॉल यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करत त्याच्या अहवालाच्या आधारावरच पुढील धोरणे आखण्यात आली आहेत. शाह दिल्लीच्या स्थितीवर सातत्याने नजर ठेवून
आहेत.
विदेशातून परतलेल्यांमुळे संसर्ग

मार्चमध्ये सर्वाधिक ग्रस्त देशांमधून सुमारे 35 हजार भारतीय दिल्लीत परतले होते. यातील ताप असलेल्या काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर उर्वरितांना घरी पाठविण्यात आले होते. प्रारंभी अधिक जागरुकता नव्हती तसेच चाचणीची सामग्री आणि प्रयोगशाळाही नव्हती. अशा स्थितीत कोरोना संसर्ग एकाकडून दुसऱयात आणि दुसऱयाकडून तिसऱयात फैलावत गेला. टाळेबंदीत मंदावलेला कोरोनाचा वेग वाढण्याची शंका होती, परंतु हा संसर्ग आमच्या अंदाजापेक्षाही अधिक वेगाने फैलावल्याची कबुली केजरीवालांनी दिली आहे.
अव्यवस्थेमुळे अनेक बळी
प्रारंभिक काळात रुग्णालयांमध्ये लोकांना योग्यवेळी उपचार मिळू न शकल्याने अधिक बळी गेले आहेत. लोक बेडसाठी पळापळ करत होते. दिवसरात्र मला त्रस्त लोकांचे फोन येत होते आणि मी रात्र-रात्र जागून लोकांसाठी रुग्णालयांमध्ये बेडची व्यवस्था करत होतो. परंतु दिल्लीत आता स्थिती सुधारली आहे. दिल्लीत कोरोनाबाधितांसाठी 13 हजार 500 बेड उपलब्ध असून यातील केवळ 6 हजार बेड वापरात आहेत अशी माहिती केजरीवालांनी दिली आहे.
चाचण्यांचे प्रमाण वाढविणार
राजधानीत शनिवारी उच्चांकी 21 हजार 144 चाचण्या करण्यात आल्या आहेत. आम्ही चारपट अधिक चाचण्या करणार आहोत. दिल्लीत आता अत्यंत वेगाने चाचण्या वाढविल्या जाणार आहेत आणि अधिकाधिक लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे केजरीवाल म्हणाले. चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने मृत्यूदर नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.









