24 तासात 1432 बाधित, दोघांचा बळी
प्रतिनिधी /पणजी
गत तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून गत 24 तासात तब्बल 1432 रुग्णांची भर पडली आहे. तिसऱया लाटेदरम्यानची आतापर्यंतची ही सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. त्यामुळे राज्यात सध्या भयावह स्थिती निर्माण झाली असून आजही सर्रास मार्गदर्शक तत्वांचा फज्जा उडविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
बुधवार, गुरुवार व शुक्रवार या तिन्ही दिवसात रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ दिसून आली आहे. शुक्रवारी दिवसभरात 1432 बाधित सापडले आहेत. त्याशिवाय दोघांचा मृत्यूही झाला असून आतापर्यंतच्या मृतांची संख्या 3530 वर पोहोचली आहे.
गत 24 तासात 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सक्रीय रुग्णसंख्या तब्बल 5931 एवढी नोंद झाली आहे. शुक्रवारी एकूण 6592 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 1432 बाधित सापडले. त्यापैकी 14 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले, तर 1418 जणांना गृह विलगिकरण देण्यात आले. चौघांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहेत. वर्षभरातील बाधितसंख्या 186198 तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 176737 वर पोहोचली आहे.
- 7 जानेवारीपर्यंतचे एकूण रुग्ण 186198
- बरे झालेले रुग्ण 176737
- सक्रिय रुग्ण 5931
- 7 जानेवारीचे नवीन रुग्ण 1432
- बरे झालेले रुग्ण 112
- कोरोना बळी 2
- वर्षभरातील एकूण बळी 3530









