प्रतिनिधी / नागठाणे :
संपूर्ण सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार व संसर्ग वाढत असताना नागठाणे ग्रामपंचायतीने वेळेवर उपाययोजना केल्याने कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यात यश प्राप्त केले आहे, अशी माहिती सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे व उपसरपंच अनिल साळुंखे यांनी दिली.
यावेळी त्यांनी सांगितले की, गावात रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गावात भरणारा आठवडा बाजार व भाजी मंडई तत्काळ बंद केला.तसेच गावात संचारबंदी जाहीर करून लोकांच्या हालचालींवर निर्बंध आणले.
याचबरोबर सोडियम हायड्रोक्लोराईडची संपूर्ण गावात फवारणी करण्यात आली. तसेच ज्या बाधितांच्या घरी विलागीकरण होणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु झाल्यानंतर होणारी गर्दी लक्षात घेता लसीकरण व स्वेब तपासणी साठी वेगवेगळ्या शाळांमध्ये स्वतंत्र सोय करण्यात आली. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या व सोशल डिस्टगशन न पाळणाऱ्या,मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर बोरगाव पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच डेंगुसदृश रुग्ण आढळल्याने गावात फॉग मशीनद्वारे फवारणी करण्यात आली.
ग्रामपंचायतीने तात्काळ राबविलेल्या या निर्णयामुळे गावातील रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरगाव पोलीस स्टेशन व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले अशी माहिती सरपंच बेंद्रे व उपसरपंच साळुंखे यांनी दिली.









