डॉ. संजय पोरवाल यांचे प्रतिपादन : शांताई वृद्धाश्रमातर्फे कोरोना योद्धय़ांचा सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाचा काळ हा सर्वांसाठीच कठीण होता. या काळात खरी कसरत झाली ती वैद्यकीय व त्यावर आधारलेल्या सेवांची. या काळातही जीवाची बाजी लावून डॉक्टर, नर्स, शववाहिका व शवागृहातील कर्मचारी, स्मशानभूमीतील कामगारांनी न घाबरता काम केले. त्यामुळे कोरोनासारख्या मोठय़ा महामारीतून बाहेर पडलो. त्यामुळे हे कार्य कौतुकास्पद असून पुढील काळासाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन हृदयरोगतज्ञ डॉ. संजय पोरवाल यांनी केले.
बामनवाडी येथील शांताई वृद्धाश्रमातर्फे शुक्रवारी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. एकूण 20 योद्धय़ांचा सत्कार करून त्यांना कपडे व मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. पोरवाल बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नागेश चौगुले, डॉ. शैलेश मुतकेकर, डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. भूषण सुतार, डॉ. अनिल पाटील, भगवान वाळवेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, पत्रकार दिलीप कुरुंदवाडे उपस्थित होते.
प्रारंभी विजय मोरे यांनी प्रास्ताविक करून कोरोना योद्धय़ांची माहिती करून दिली. संतोष ममदापूर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आशिष मेहता यांनी गिटारच्या सुरांवर सर्वांचे स्वागत केले. भगवान वाळवेकर यांनी कोरोना योद्धय़ांच्या कार्याला दाद दिली. यावेळी स्मशानात अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, शववाहिका व शवविच्छेदन करणारे कर्मचारी, डॉक्टर, हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांचा सत्कार करण्यात आला. जेमल मेहता व विजय पोरवाल यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विजय आचमणी, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर, आलन मोरे, सूरज गवळी, शरल मोरे यांच्यासह बेळगावमधील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.









