नोंदीबाबत आरोग्य खात्याकडून तपशील नाही : गुरुवारी बळी नाही, 31 जण नवे बाधित
प्रतिनिधी / पणजी
कोरोनाच्या 94 अतिरिक्त बळींची नोंद आरोग्य खात्याने आता अचानक केल्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 3388 वरुन 3482 वर पोहोचली आहे. हे मृत्यू धक्कादायक असून त्यांची भर काल गुरुवारी घालण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागे दोन वेळा अशाप्रकारे कोरोनाचे बळी अचानकपणे वाढविण्यात आले होते. या वाढीव बळी प्रकरणामुळे कोरोनाचे नेमके किती मृत्यू झाले? अगोदर का दडवण्यात आले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य खात्यातर्फे काल गुरुवारी प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीमध्ये ऑगस्ट 2020 ते जून 2021 या कालावधीत हे 94 मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. ती संख्या आता एकूण मृत्यूंमध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे बुधवारी असलेल्या 3388 हा एकूण मृतांचा आकडा 94 ने वाढून 3482 वर पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.
या वाढीव बळींची नोंद त्या त्या वेळी (दिवशी – महिन्यात) का झाली नाही? असा सवाल उपस्थित झाला असून त्याबाबत आरोग्य खात्याने कोणताही खुलासा केलेला नाही.
आरोग्य खात्याकडून तपशील नाही
ऑगस्ट 2020 ते जून 2021 या 11 महिन्यात कोरोनाचे 94 बळी गेल्याचे आरोग्य खात्याने या प्रकरणातून मान्य केले आहे. त्याचा विचार केल्यास प्रत्येक महिन्यात सरासरी 8 ते 9 बळी गेले आहेत. हे बळी गोमेकॉत किंवा जिल्हा हॉस्पिटल किंवा खासगी हॉस्पिटलात गेले, याचाही तपशील देण्यात आलेला नाही. या बळींची नोंद आता उशिरा झाल्याचे खात्याने म्हटले आहे. तथापि त्यास उशीर का झाला? याचा कोणताही उलगडा खात्याने केलेला नाही.
गुरुवारी एकही बळीची नोंद नाही
दरम्यान, गेल्या 24 तासात म्हणजे गुरुवारी एकाही बळीची नोंद झाली नाही परंतु 31 नवे बाधित सापडले आणि 24 जण बरे झाले. दिवसभरात 4 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले तर 5 जणांना तेथून घरी पाठविण्यात आले. कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 448 असून 27 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 179338 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 175408 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
आरोग्य केंद्रनिहाय सक्रिय रुग्णसंख्या
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे ः डिचोली – 8, सांखळी – 10, पेडणे – 9, वाळपई – 2, म्हापसा – 19, पणजी – 49, हळदोणा – 11, बेतकी – 2, कांदोळी – 23, कासारवर्णे – 0, कोलवाळ – 1, खोर्ली – 18, चिंबल – 14, शिवोली – 6, पर्वरी – 10, मये – 0, कुडचडे – 15, काणकोण – 2, मडगांव – 74, वास्को – 10, बाळ्ळी – 7, कासावली – 22, चिंचिणी – 23, कुठ्ठाळी – 15, कुडतरी – 6, लोटली – 15, मडकई – 1, केपे – 12, सांगे – 3, शिरोडा – 0, धारबांदोडा – 6, फोंडा – 12, नावेली – 43.
9 डिसेंबरपर्यंतचे एकूण रुग्ण 179338
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 175408
सक्रिय रुग्ण 448
नवीन रुग्ण 31
बरे झालेले रुग्ण 24
कोरोना बळी 00
आतापर्यंतचे एकूण बळी 3482









