एकंदर रूग्णसंख्या 31 लाख 61 हजार, मृत्यूदरही घटला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही वाढून ते आता 75.90 टक्क्यांवर पोहचले आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या कालावधीत 56 हजार 349 नव्या रूग्णांची भर पडली असली तरी 63 हजार 071 रूग्ण बरेही झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रूग्णांची संख्या 6 हजारांहून अधिकने घटली असून आता ती 7 लाख 4 हजार 568 इतकी आहे. एकंदर रूग्णसंख्येच्या केवळ 0.29 टक्के रूग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. हे प्रमाण आजही जागतिक प्रमाणाच्या तुलनेत कमी आहे, अशी माहिती देण्यात आली.
राज्यांचा विचार करता नव्या रूग्णसंख्येचा संदर्भात आजही महाराष्ट आघाडीवर आहे. गेल्या चोवीस तासात या राज्यात 14 हजार 219 रूग्णांची भर पडली. तर आंध्र प्रदेश 8,741, कर्नाटक 8 हजार 61, तामिळनाडू 6,129, उत्तर प्रदेश 4,494, पश्चिम बंगाल 3,285 आणि ओडीशा 2,519 असे इतर काही राज्यांमधील नवे रूग्ण आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
देशात सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 6 लाख 93 हजार 398 इतकी आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 5 लाख 2 हजार 490 आहे. बरे होण्याचे प्रमाण दिल्लीत सर्वाधिक असून ते 91 टक्यांपर्यंत पोहचले आहे. केंद्र सरकारने चाचण्यांची संख्या वाढवूनही रूणसंख्या आता स्थिरावत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. त्यामुळे लोकांचाही आत्मविश्वास वाढला असून कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य नाही, अशी भावना निर्माण झाली आहे.









