कोरोना या विषाणूच्या नियंत्रणासाठी भारतात तसेच जगभरात बनविण्यात आलेल्या लसी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावशाली आहेत, असे वारंवार स्पष्ट करूनही आजही अनेकांचा त्यावर विश्वास बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः खेडय़ांमध्ये महिला लस टोचून न घेण्यासाठी विविध स्वारस्यपूर्ण कारणे पुढे करीत आहेत. लस टोचून घेतल्यास ताप येईल. मग स्वयंपाक कोण करणार? असा प्रश्न त्या विचारतात. कोरोना लसीबद्दल प्रारंभीच्या काळात राजकीय कारणास्तव पसरविण्यात आलेली भीती अजूनही व्यापक लसीकरणाच्या मार्गातील मोठा अडथळा बनत आहे, हे यावरून दिसून येत आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील अनेक खेडय़ांमध्ये महिला आजही लस टोचून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. लसीमुळे ताप येतो आणि तीनचार दिवस अंथरुणात पडून रहावे लागते, हा गैरसमज त्यांच्या मनात पक्का रुजला आहे. तसे झाल्यास घरकाम आणि स्वयंपाक-पाणी कोण बघणार, असा त्यांचा निरागस प्रश्न असतो. पण या गोष्टी स्वतःच्या जीवापेक्षा काही मोठय़ा नाहीत, हे त्यांना सांगूनही पटत नाही. अनेक अभ्यासकांच्या मतानुसार या महिला केवळ लस टाळण्यासाठी ही कारणे पुढे करतात. लसीमुळेच कोरोना होईल, ही भीती त्यांच्या मनात घट्ट रुजलेली आहे. ती नाहीशी केल्याशिवाय ग्रामीण भागात महिलांकडून लसीकरणाला व्यापक पाठिंबा मिळणार नाही, असे दिसून येते. त्यामुळे लसीकरणाच्या मार्गात किती आव्हाने उभी आहेत, याची कल्पना आल्याशिवाय रहात नाही.









