ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना पसरवण्याचा कट रचल्याच्या संशयातून जमावाने केलेल्या मारहाणीत एका 22 वर्षीय तबलिगीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या बवानामध्ये हा प्रकार घडला.
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेला तरुण तबलिगी जमातच्या एकाकार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातल्या भोपाळमध्ये गेला होता. तो 45 दिवसांनंतर भाजीपाल्याच्या एका ट्रकमधून दिल्लीत परतला. त्याला आझादपूरमधल्या भाजी मंडईत रोखण्यात आले. त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. गावात पोहोचल्यानंतर काही जणांनी तो कोरोना विषाणूचा फैलाव करण्याच्या हेतूने योजना आखून गावात परतल्याची अफवा गावभर पसरवली. त्यांनंतर गावातील काही जणांनी त्याला शेतात नेऊन जबर मारहाण केली. दरम्यान, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.









