-जिल्हा आरोग्य विभागाचा आराखडा तयार
कृष्णात चौगले/कोल्हापूर
ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. प्रतिबंधित क्षेत्राची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आता `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ करण्याचे नियोजन केले असून त्याबाबत लवकरच सर्व तालुक्यातील तहसिलदारांना सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानुसार कोरोनाबाधित व्यक्ती गावातील ज्या भागातील व्यक्तींच्या संपर्कात आली आहे, तो परिसर `सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्राच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या जाणार असून गावातील इतर व्यवहार मात्र सुरळीतपणे सुरु राहणार आहेत.
दुसऱया लाटेत जिह्यात मे महिन्यात 20.6 टक्केपर्यंत पोहोचलेला कोरोना पॉझिटीव्हीटी रेट जुलै महिन्यात 9.5 टक्केपर्यंत खाली आला आहे. सध्या पॉझिटीव्हीटी रेट कमी होत असला तरी मृत्यू दर मात्र अद्याप 2.9 टक्के इतकाच आहे. सद्यस्थितीत 12 तालुक्यात 1 हजार 155 प्रतिबंधित क्षेत्र असून 4 हजार 460 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 8 ते 14 जुलैदरम्यान 86 हजार 428 नागरीकांची कोरोना चाचणी केली. यामध्ये 8 हजार 88 बाधित सापडले. या कालावधीत संसर्गाच्या प्रमाणात चढउतार सुरु असला तरी दररोज सरासरी दीड हजारांहून अधिक रुग्णसंख्या होत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या ग्रामदक्षता समित्यांनी सक्षमपणे भूमिका निमाभवली, त्याच समित्यांमध्ये आता मरगळ आल्याचे चित्र आहे. त्यामुळे बाधित व्यक्तीच्या `फस्ट कॉन्टॅक्ट’मधील लोक मास्कशिवाय गावातून फिरत असल्याचे चित्र आहे. तसेच एखाद्या गल्लीतील एक ते दोन नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास संपूर्ण गल्ली अथवा गाव प्रतिबंधित केले जात असल्यामुळे इतर नागरीकांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची संकल्पना पुढे आली असून त्यानुसार जि.प.च्या आरोग्य विभागाने नियोजन सुरु केले आहे. यामध्ये एखाद्या गावात कोरोना बाधित रुग्ण सापडल्यास, तो ज्या परिसरातील व्यक्तींच्या संपर्कात आला आहे, तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. पुढील पंधरा दिवसांत प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त इतर भागातील व्यक्ती बाधित सापडल्यास पुन्हा तो परिसरही प्रतिबंधीत केला जाणार आहे. याबाबतची नियमावली आरोग्य विभागाने तयार केली असून त्याबाबतच्या सूचना लवकरच बारा तालुक्यातील तहसिलदारांना दिली जाणार आहे.
294 गावे कोरोनामुक्त
जिह्यातील एकूण 1025 ग्रामपंचायत क्षेत्रापैकी 294 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. यामध्ये चंदगड तालुक्यातील 109 गावांपैकी सर्वाधिक 63 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तर शाहूवाडी 61, भुदरगडमधील 58, आजरामधील 24, गडहिंग्लजमधील 24, गगनबावडÎातील 31, हातकणंगले 1, कागल 8, करवीर 21, पन्हाळा 1, राधानगरी 1 तर शिरोळ तालुक्यातीलही केवळ 1 गाव कोरोनामुक्त आहे.
बाधित रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांनी घेतली नाही लस
जिह्यात सध्या 9 हजार 231 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. यापैकी तब्बल 4 हजार 554 रुग्णांनी कोरोना लस घेतलेली नाही. तर 3 हजार 617 रूग्णांनी पहिला डोस घेतला असून 1 हजार 60 रुग्णांनी दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये लस घेतलेल्या बहुतांशी रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत. तर ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांना गंभीर लक्षणांना सामोरे जावे लागत असल्याचे आरोग्य विभागाचे अभ्यासपूर्ण मत आहे.
27 टक्के रुग्ण घरातच घेत आहेत उपचार
सद्यस्थितीत एकूण 11 हजार 830 बाधित रुग्णांपैकी 5 हजार 55 (42.73 टक्के) रुग्ण साध्या बेडवरती उपचार घेत आहेत. 1 हजार 819 (15.38 टक्के) रूग्णांवर ऑक्सिजन बेडवरती उपचार सुरु आहेत. 791 (6.43 टक्के) रुग्ण व्हेंटीलेटवर आहेत. 944 (7.98 टक्के) रुग्ण संस्थात्मक अलगीकरण कक्षात तर 3 हजार 251 (27.48 टक्के) रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. दुसऱया लाटेत एकूण कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आणि मृत्यूचे तुलनात्मक चित्र पाहता यामध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तब्बल 19.9 टक्के रुग्णांचा पहिल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.
सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राबाबत लवकरच तहसिलदारांना सूचना
कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास लक्षणे दिसल्यानंतर कोणकोणत्या परिसरात संपर्कात आला आहे, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला जाणार आहे. आजतागायत 1 रुग्ण बाधित सापडल्यास संपूर्ण गाव अथवा गल्ली प्रतिबंधित केली जात होती. मात्र यापुढे बाधित व्यक्तीच्या संपर्कातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जाणार आहे. या क्षेत्रामध्ये शासनाने दिलेले नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. – डॉ.योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.कोल्हापूर