ऑनलाईन टीम / सोना :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱया सुटय़ा भागांची कमतरता ह्युंदाई कंपनीला भासत आहे. त्यापार्श्वभूमीवर दक्षिण कोरियातील ह्युंदाई कारचे उत्पादन काही काळासाठी थांबविण्यात आले आहे.
सोलच्या किनारी भागातील उलसान येथे ह्युंदाई कारचा प्रकल्प आहे. या ठिकाणी वार्षिक 14 लाख कारचे उत्पादन घेण्यात येते. वाहनांच्या सुट्या भागांची मोठय़ा प्रमाणावर आयात आणि निर्यात करणे उलसान येथे सोपे जाते. मात्र, चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजविल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तेथील कारखाने बंद ठेवण्यात आले आहेत.
चीनमधील कारखाने बंद असल्याने ह्युंदाईला सुटय़ा भागांचा पुरवठा होत नाही. परिणामी कंपनीने काही काळ उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियात 25 हजार कामगारांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. या कामगारांच्या वेतनात कपातही करण्यात येणार आहे. ह्युंदाईसह इतर कंपन्यांनीही आपले उत्पादन थांबविले आहे. याशिवाय रेनॉल्टची उपकंपनीही आपला प्रकल्प बंद ठेवण्याच्या विचारात आहे. पाच दिवस प्रकल्प बंद राहिल्यास ह्युंदाईला 50 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.