कोरोना काळात व्यवसाय वर्तुळ पुरतेपणी बदलले गेले. बदलती स्थिती, व्यावसायिक आव्हाने, आर्थिक मर्यादा, कर्मचाऱयांची कमतरता, वातावरणातील अनिश्चितता, आरोग्य क्षेत्रातील काळजी करण्याजोगी स्थिती यांचा सामना व्यक्तिगत नव्हे तर व्यावसायिक-संस्थात्मक स्तरावर सर्वांना करावा लागला. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय संस्था, पोलीस-प्रशासन इ. च्या जोडीलाच बँका-वित्तीय संस्था, खासगी कंपन्या, विभिन्न उद्योजक, व्यावसायिक इ. नी कोरोना काळात केवळ आपली कार्यक्षमताच नव्हे तर व्यावसायिक कल्पकतेचा कृतिशील परिचय करून प्रसंगी पर्यायी व्यवसाय प्रस्थापित केले असेच नव्हे तर ते यशस्वीपण करण्याची कर्तबगारी केली. भारतीय रेल्वे मंत्रालयसुद्धा या सर्वंकष प्रक्रियेत थांबले अथवा माघारले नाही. कोरोना काळातही भारतीय रेल्वेची यशस्वी यात्रा म्हणूनच प्रभावी व प्रशंसनीय ठरते.
भारतीय रेल्वेच्या संदर्भातील या व्यावसायिक वस्तुस्थितीची पार्श्वभूमी म्हणजे कोरोनाच्या प्रदीर्घकाळात देशासह रेल्वेच्या इतिहासात पण पहिल्यांदाच मोठय़ा कालखंडासाठी रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. लॉकडाऊन काळात प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने रेल्वेचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसायपण ठप्प झाला व मोठे व्यावसायिक-आर्थिक संकट त्यामुळे निर्माण झाले. हे सारे अनपेक्षितपणे झाले हे पण विशेष.
या अशा अनपेक्षित व आव्हानपर संकटांवर मात करण्यासाठी भारतीय रेल्वेने आपले कर्मचारी आणि उपलब्ध व्यवस्था-संसाधने यांच्या वापरासाठी जे व्यवस्थापनपर आणि व्यावसायिक निर्णय घेऊन त्यांची मर्यादित काळात पण यशस्वीपणे अंमलबजावणी केली त्यामुळे व्यवस्थापकीय निर्णय, नियोजन, इच्छाशक्ती, जिद्द व त्याला कर्मचाऱयांची साथ मिळाल्यास अत्यंत विपरीत व्यवसाय स्थितीवर यशस्वीपणे मात कशाप्रकारे करता येते, याचा व्यवस्थापकीय वस्तुपाठ पण यानिमित्ताने सर्वांना मिळाला आहे. या संदर्भातील थोडक्यात पण उल्लेखनीय बाब म्हणजे प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने आर्थिक-व्यावसायिक संकटांचा सामना करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने काही धोरणात्मक व महत्त्वाचे निर्णय घेऊन त्यांची लगोलग अंमलबजावणी केली. यामध्ये विशेष मालवाहू गाडय़ांचा गरजानुरुप व अतिरिक्त फेऱयांचा समावेश प्रामुख्याने करण्यात आला. त्यातही वैशिष्टय़पूर्ण म्हणजे लॉकडाऊनमध्ये ज्यावेळी आंतरराज्यीय वाहन वाहतूक बंद होती, त्यावेळी मालवाहू ट्रकची वाहतूक पण अर्थातच होत नव्हती. यामध्ये दैनंदिन व्यवहार आणि उपयोगांच्या ट्रकद्वारे होणाऱया आंतरराज्यीय वाहतुकीचा पण समावेश होता. उत्पादक, विपेते, वाहतूकदार, व्यापारी, ग्राहक इत्यादी सर्वांपुढे मोठे व अक्षरश: अभूतपूर्व असे व्यवसाय व उदरनिर्वाहाचे संकट दीर्घकालीन स्वरुपात उभे ठाकले. यामध्ये अर्थातच कोरोना काळातील चाकोरी, मार्गदर्शक व अत्यावश्यक कार्यपद्धतींची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे होते. या आव्हानपर परिस्थितीचा भारतीय रेल्वेने ‘रोरो’ (रोल ऑन रोल ऑफ) या सेवेद्वारे जो सामना केला, तो केवळ अजोड ठरला.
प्रवासी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्यानंतर रेल्वेने आपले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मालवाहतुकीच्या एकमेव पर्यायाला जोड देण्यासाठी ‘रोल ऑन रोल ऑफ’ या नव्या व्यवसाय पद्धतीवर काम करण्यास सुरुवात केली. या नव्या रेल्वे सेवेचा उल्लेखनीय टप्पा म्हणजे 30 ऑगस्ट रोजी बेंगळूरजवळील नेलमंगलापासून सोलापूरजवळील बेल या यार्ड-स्थानकापर्यंत सुरू करण्यात आलेली ‘रोल ऑन रोल ऑफ’ ही सेवा.
रेल्वेच्या या नव्या सेवेचे वैशिष्टय़ म्हणजे मालवाहू गाडीद्वारा विविध प्रकारच्या माल आणि वस्तूंनी भरलेल्या मोठय़ा व अवजड ट्रक्सची रेल्वेद्वारा करण्यात आलेली वाहतूक. या विशेष मालवाहतूक रेल्वेचा प्रवास दक्षिणेतील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमार्फत महाराष्ट्रापर्यंत झाल्याने या राज्यांना त्याचा फायदा झाला.
ज्या परिस्थितीत ही ‘रोरो’ सेवा सुरू करून अमलात आणली गेली त्याचे वैशिष्टय़ म्हणजे लॉकडाऊन अंतर्गत वाहन प्रवास व जिल्हा आणि राज्यबंदी असल्याने रेल्वेच्या पुढाकार आणि माध्यमातूनच ही वाहतूक शक्मय आणि यशस्वी झाली व मोठय़ा प्रमाणावर ग्रामीण उत्पादन, धान्य, गरजेच्या वस्तूंच्या पुरवठा वर नमूद केलेल्या राज्यांना झाला. मुख्य म्हणजे रेल्वेद्वारा मालवाहू ट्रक्सची ही वाहतूक केल्याने वेळ आणि पैसा या उभयतांची बचत तर झालीच, शिवाय कठीण व्यवसायप्रसंगी रेल्वेला एक मोठा पर्यायी व्यवसाय उपलब्ध झाला. या संदर्भात तपशिलासह सांगायचे झाल्यास सामान्य काळात पण दररोज बेंगळूर ते सोलापूर या दोन प्रमुख व्यापारी व व्यावसायिक शहरांमध्ये हजारोंनी ट्रकद्वारे मालवाहतूक होते. ही मालवाहतूक खर्चिक व तुलनेने असुरक्षित असते. महामार्गावर होणारे ट्रक व इतर वाहनांचे अपघात नित्याचे असतातच, शिवाय या वाहतुकीमुळे प्रदूषणाचा प्रश्न असतो. हे सारे प्रश्न ‘रोरो’ने संपुष्टात आणले.
याशिवाय ‘रोरो’ने झालेला अन्य फायदा म्हणजे वेळेची झालेली बचत. एरवी अवजड ट्रकला बेंगळूर-सोलापूर माल वाहतुकीसाठी 28 तासांचा कालावधी लागतो तर रेल्वेच्या तत्पर पुढाकाराने ही वाहतूक 16 तासात करण्यात आली. लोकांना अत्यावश्यक व काही नाशवंत पदार्थांचा पण त्यात समावेश होता व त्याचा लाभ कोरोना काळात विविध राज्यातील जनतेला झाला.
केंद्र सरकारने 2020-21 अर्थसंकल्पात केलेल्या ‘किसान रेल’ या विशेष मालवाहतूक घोषणेची अंमलबजावणी कोरोनाकाळात करून रेल्वेने आपल्या कार्यक्षमतेचा परिचय सर्वांना करून दिला. महाराष्ट्रातील नाशिक रोड-देवळाली येथून बिहारच्या दानापूरपर्यंत पहिली ‘किसान रेल’ सुरू झाली. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमार्गे बिहारला जाणाऱया या ‘किसान रेल’ने 31 तासांच्या विक्रमी काळात विविध राज्यातील शेतकऱयांच्या फळे, भाजीपाला, दूधपदार्थ इत्यादींची वाहतूक शक्मय झाली. या वाहतुकीमुळे कोरोनाळात किसान-ग्राहक या उभयतांचा वेळेत फायदा झालाच शिवाय रेल्वेला नव्या प्रकारच्या व्यवसायातून महसूल मिळाला.
कोरोना काळात रेल्वेने प्रवाशांसह जनसामान्यांसाठी घेतलेले अन्य दोन महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे भारतभर केलेल्या ‘श्रमिक रेल्वे’च्या वाढत्या फेऱया व मोठय़ा संख्येत रेल्वेच्या शयनयान डब्यांचे कोविड उपचार केंद्रामध्ये केलेले रूपांतर. श्रमिक रेल्वेने देशभरातील श्रमिकांची आपल्या गावी पोहोचण्याची फार मोठी सोय झाली तर रेल्वे डब्यांच्या कोविड केंद्राने कोरोनाग्रस्तांच्या मोठय़ा प्रमाणावरील उपचारांची सोय झाली. रेल्वेचे हे प्रयत्न आणि उपक्रम कोरोना काळात व्यक्तिगत व व्यावसायिक दोन्ही संदर्भात उपयुक्त व भविष्यकाळासाठी मार्गदर्शक ठरले.
दत्तात्रय आंबुलकर








