ज्या कवींना गोत्र-होत्र-गावगप्पातच आपली कविताही रंगवायची असते, ज्यांना क्षणाक्षणाला कविता पाडून कवितेच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्येच समाधान मिळते, त्यांना असे सांगणे म्हणजे उलटय़ा घडय़ावर पाणीच!
कोरोना व्हायरसमुळे जग भयग्रस्त झाले आहे. प्रत्येक माणसाला स्वतःच्या जीवाचे पुढे काय होईल, अशा चिंतेने ग्रासले आहे. स्वतःच्याच श्वासाची स्वतःलाच हमी देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वतःसमोरच स्वतःची हतबलता काय असते, याचा अनुभव विचारी माणूस घेत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्यांना झाला आहे, त्याचबरोबर त्यांच्यासाठी इतरही झटत आहेत, त्या सर्वांचे काय होईल अशा काळजीने विचारशील माणसाची झोप उडाली आहे. कवी हा याच विचारशील माणसात मोडतो. कारण तो सभोवतालच्या दुःखाचे चिंतन करत असतो. ते दुःख पचवतच, त्याचे उद्गार काही काळानंतर त्याच्या कवितेतून व्यक्त होत असतात. या अर्थाने कवी हा समाज वेदनेचा वाहक असतो. मात्र, कोरोनाच्या या कधी नव्हे एवढय़ा संवेदना कायम जागृत ठेवायला लावणाऱया काळात कोरोनानंतर आता कवींचीच भीती वाटावी, असा उच्छाद कवींनी ‘लाईव्ह’ कार्यक्रमाच्या नावाखाली मांडला आहे. अर्थात हे हौसे-नवसे कवी आहेत. चांगली कविता या पलीकडे मराठीत लिहिली जात आहे. त्याचा आदर आपण बाळगायला हवा पण कवींच्या ‘लाईव्ह’ काव्य वाचनाचा जो भडीमार सुरू आहे, त्यामुळे लोकांच्या सततच्या मृत्यूने मन सुन्न झाले आहे, समाजात जो सन्नाटा पसरला आहे, यापासून हे रंगरंगोटीवाले कवी दूरच आहेत की काय असा प्रश्न पडतो आहे.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’ अशी एका गाण्याची ओळ प्रसिद्ध आहे. या गाण्याची आठवण व्हावी, अशा स्थितीत काही वयस्कर लेखकही सोशल मीडियावर सध्या वावरताना दिसत आहेत. आपल्या मुलीच्या वयाच्या मॉडेलचे फोटो पोस्ट करून ‘अजूनी यौवनात मी’चा प्रत्यय देत आहेत. म्हातारपणातील ही मोहिनीविद्या त्यांना प्राप्त झाली असेल, तर नव्या हौशी कवींनी कोरोनाच्या नावाखाली तोंड उजळून कोरोनासंदर्भात आपला लाईव्ह परफॉर्मन्स सादर केला, तर बिघडले कुठे असे उद्गार उपहासाने मध्यंतरी काढले गेले. अर्थात ते बरोबरच आहे पण ‘आम्ही बिघडलो, तुम्हीही बिघडा’ ही वृत्ती वाढीस लागणे केव्हाही घातकच. कवितेचे जसे विविध प्रकार असतात, त्याचप्रमाणे कविता सादरीकरणाचेही प्रकार वाढीस लागले आहेत. कवितेचे प्रकार जसे कवितेचा आशय जोरकसपणे व्यक्त करण्यासाठी पूरक ठरतात, त्याचप्रमाणे कवितेचे सादरीकरणही व्हायला लागले, तर मात्र कठीणच आहे. या लॉकडाऊनच्या काळात महामारीने दिवसाला हजारो माणसे मरत आहेत, त्याच पटीत महामारीच्या कविता लिहिल्या जात आहेत आणि त्यांचे लाईव्ह सादरीकरण होत आहे. हे जसे त्या भाषेच्या चांगल्या कवितेच्या वाढीसाठी वाईट आहे, त्याचप्रमाणे त्या-त्या कवींच्या कवितेच्या भवितव्यासाठीही धोकादायक आहे. पण लक्षात कोण घेतो अशी सार्वत्रिक परिस्थिती आहे. इथे आपल्या काही कवींच्या नमुन्याचाही विचार करता येईल. लॉकडाऊनच्या काळात सार्वत्रिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जाहीर कार्यक्रमातून आपल्या कवितेतील भावना व्यक्त करण्यास मर्यादा आल्यामुळे अनेक कवींचा जीव कासावीस झाला आहे. शेवटी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे हे चांगलेच आहे की, पण त्या मोकळय़ा करताना इतरांना उबग येईल, असे सादरीकरण क्षणाक्षणाला लाईव्ह होत राहिले, तर सामान्य माणसासमोर कवीच बदनाम होतील, याचीही काळजी घ्यायला हवीच ना! बरे, हे हौशी कवी एवढेच करत नाहीत, तर आपल्या कविता सादरीकरणासोबत लोकांना असे काय जीवनाचे ज्ञान सांगतात, की चार वेद, दहा उपनिषदे, अठरा पुराणे, भगवद्गीता, शांकरभाष्य, महाभारत, श्रीकृष्ण चरित्र, रामायण, मनुस्मृती आदींचे या काळात वाचन केले, तर तुम्हाला मन:शांती लाभेल, असाही सल्ला देत आहेत. ज्यांची बौद्धिक उन्नती झाली आहे, अशा वर्गाचे निरीक्षण केले, तर असे लक्षात येते, की जी माणसे परंपरेची उलट तपासणी करतात, ती माणसे मनाने सर्वाधिक समतोल असतात आणि जी माणसे परंपरेला शरण जातात, ती माणसे अनिष्ट परंपरेलाच शरण जातात. शेवटी त्यांचा कधी ना कधी तरी मानसिक समतोल ढासळतो. अशावेळी कवींची जबाबदारी काय असते? त्यांनी अशाच काळात समाजमन सुस्थितीत रहावे म्हणून प्रबोधन करण्याची गरज असते. अर्थात कवींचे एवढेच काम आहे, असेही नाही. किमान या अरिष्ट काळाला कसे सामोरे जावे हे त्यांना सांगता येत नसेल, तर सतत कवितांचा पाऊस पाडून वेडय़ावाकडय़ा सादरीकरणातून आपली कुचेष्टा तरी करून घेऊ नये. एवढी माफक अपेक्षा बाळगली, तर त्याबाबत कुणाचे दुमत असू नये! विख्यात हिंदी कवी नरेश सक्सेना यांची भुकेसंदर्भातील एक कविता आहे. त्यांचा अनुवाद कवी संदीप जगदाळे यांनी केला असून त्या कवितेत सक्सेना म्हणतात,
‘भूक सगळय़ात आधी मेंदू खाते, त्यानंतर डोळे
त्यानंतर शरीरात उरलेल्या इतर गोष्टी
मागे काहीच सोडत नाही भूक
ती नात्यांना खाऊन टाकते
आईचं असो, बहिणीचं की मुलाचं
मुले तर तिला खूपच आवडतात
त्यांना ती सर्वात आधी
आणि खूप घाईघाईत खाते
मुलांनंतर मग शिल्लक तरी काय राहतं.’..
वाचणाऱयाचे काळीज चिरत जाणारे हे शब्द आहेत. महामारीने कष्टकऱयांवर अशीच वेळ आणली आहे. हतबलता काय असते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. असे अनेकांना सध्या जगावे लागत आहे. कवीने याचाच तर शोध घ्यायचा असतो. पण ज्या कवींना गोत्र-होत्र-गावगप्पातच आपली कविताही रंगवायची असते, ज्यांना क्षणाक्षणाला कविता पाडून कवितेच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्येच समाधान मिळते, त्यांना असे सांगणे म्हणजे उलटय़ा घडय़ावर पाणीच!
अजय कांडर








