प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री पावसाची संततधार सुरू राहिल्याने गेल्या तीन दिवसंपासून कमी झालेली पाण्याची आवक मंगळवारी पहाटे वाढली आणि ती प्रतिसेकंद 41 हजार 158 क्युसेक्स इतकी झाली. मात्र मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर पुन्हा कमी झाल्यामुळे कोयना धरणात चोवीस तासांत केवळ दीड टीएमसी पाण्याची वाढ झाली. परिणामी मंगळवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 75.63 टीएमसी इतका झाला.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन, तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असतानाच सोमवारी रात्रभर मात्र पाणलोट क्षेत्राला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. मंगळवारी पहाटे धरणात येणारी पाण्याची आवक दुपटीने वाढून ती प्रतिसेकंद 41 हजार 158 क्युसेक्स इतकी झाली. मात्र मंगळवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर पुन्हा कमी झाल्याने गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात केवळ दीड टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे मंगळवारी सायंकाळ पर्यंत धरणातील पाणीसाठा 75.63 टीएमसी इतका झाला.
गतवर्षीच्या तुलनेत केवळ 25 टक्के पाण्याची आवक
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कोयना धरणात केवळ 25 टक्केच पाण्याची आवक झाली असल्याचे दिसत आहे. गतवर्षी 25 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत 108.80 टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली तर या वर्षी 25 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत केवळ 26.54 टीएमसी इतक्या पाण्याची आवक झाली असल्याचे दिसून येते.
पहाटे आवक वाढली..!
सोमवारी मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे मंगळवारी पहाटे 4 वाजता कोयनानगर येथे 36,नवजा येथे 66,महाबळेश्वर येथे 50 आणि वळवण येथे61 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद होऊन धरणात प्रतिसेकंद 41 हजार 158 क्यूसेक्स पाण्याची आवक सुरू झाली मात्र मंगळवारी पावसाचा जोर कमी झाल्याने सायंकाळ पर्यंत धरणात प्रतिसेकंद 12 हजार 258 क्यूसेकस एवढी राहिली.








