प्रतिनिधी/ सातारा
हवामान खात्याने सातारा जिह्यात अतिपावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. जिह्याच्या पश्चिम भागात पावसाने चांगलाच धडाका सुरु ठेवला होता. या पावसामुळे प्रचंड हानी झाली असून नुसतीच दाणादाण उडवून दिली आहे. पाटण, जावली, सातारा तालुक्यात अनेक पुल, रस्ते वाहून गेले असून शेतीचेही अतोनात असे नुकसान झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात जोर कायम असल्याने कोयना पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक तसेच उरमोडी जलाशयातून 1986 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे कोयना नदी काठच्या गावांना दक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
गुरुवारी सकाळपासून झालेल्या पावसाने अक्षरशः कहर केला आहे. पाटण तालुक्यातील म्हारवंड, पिटेवाडी, जळव भागातील काही रस्त्यांचे नुकसान झाले आहे. डोंगर भागातील गावांचे साकव वाहून गेले आहेत. सातारा तालुक्यातील परळी भागात तीच परिस्थिती झाली आहे. जावली तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची जोरदार सकाळपासून बॅटींग सुरु होती. ही बॅटींग पश्चिम भागात सुरु असल्याने नदी काठच्या गावांना इशारा दिला होता. दरम्यान, कोयना, धोम, उरमोडी, कण्हेर या मोठय़ा धरण परिसरात पावसाचा जोर कायम होता. नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नसून नेमक्या नुकसानीचा अंदाज प्रशासनाला आलेला नाही.. दरम्यान, सायंकाळी पावसाने सातारा शहरासह तालुक्यात उघडीप घेतली होती.
जिह्यात सरासरी 28.7 मि.मी. पाऊस, आतापर्यंत सरासरी 188.0 मि.मी.पावसाची नोंद
जिह्यात गुरुवारी दिवसभरापासून शुक्रवार सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी एकूण 28.7 मि.मी.पाऊस पडला असून आतापर्यंत सरासरी 188.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात सकाळी 10 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 41.4(201.9) मि. मी., जावळी- 57.1 (304.5) मि.मी., पाटण-31.9 (251.5) मि.मी., कराड-28.1 (233.7) मि.मी., कोरेगाव-29.2 (135.8) मि.मी., खटाव-11.0 (90.9) मि.मी., माण- 2.7 (59.9) मि.मी., फलटण- 5.5 (69.9) मि.मी., खंडाळा- 13.5 (91.2) मि.मी., वाई-39.9 (195.4) मि.मी., महाबळेश्वर-73.9 (563.2) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.








