प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध रस्त्याचे डांबरीकरण दोन वर्षापूर्वी करण्यात आले होते. मात्र पावसामुळे रस्त्याची दैनावस्था झाली आहे. कॅन्टोमेंट परिसर आणि शहराला जोडणाऱया कोनवाळ गल्ली रस्त्यावरील खडी उखडली असून रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनधारकाची गैरसोय होत आहे. सदर रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी होत आहे.
कॅम्प परिसराला जोडणारे विविध रस्ते आहेत. पण यापैकी कोनवाळ गल्ली हा रस्ता देखील अतिमहत्वाचा आहे. या बाजारपेठ, गणपत गल्ली, किलोस्कर रोड अशा विविध भागात येण्यासाठी वाहनधारक कोनवाळ गल्ली रस्त्याचा वापर करतात. विविध शाळांना जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. तसेच रस्त्यावर महापालिकेचे विभागिय कार्यालय, रंगमंदीर, हॉस्पिटल तसेच व्यवसायिक गाळे आहेत. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची रहदारी असते. हा रस्ता खराब झाल्याने दोन वर्षापूर्वी व मागीलवषी काही भागाचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सध्या रस्त्याची दुरावस्था झाली असून, संपूर्ण रस्ता उखडला आहे. ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता महत्वाचा असल्याने रस्त्याची दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.









